काठावर पास आमदारांना द्यावी लागणार अग्निपरीक्षा

कल्याण ग्रामीण, भिवंडी पूर्व-पश्चिम, उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात होणार हातघाई

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी कल्याण ग्रामीण, भिवंडी पूर्व-पश्चिम आणि उल्हासनगर या चार विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार हे मागील निवडणुकीत काठावर उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळालीच तर त्यांच्यापुढे बदललेल्या राजकीय समीकरणाचे मोठे आव्हान आहे.

२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत अगदी कमी मतांच्या फरकाने कल्याण ग्रामीण, भिवंडी पूर्व-पश्चिम आणि उल्हासनगर मतदारसंघातील चार आमदार काठावर उत्तीर्ण झाले होते. त्यात आता बदललेल्या राजकीय समिकरणामुळे त्यांच्या हक्काची मतेही विभागण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण १८ जागा आहेत. त्यामुळे सत्तेचे गणित जुळवण्यासाठी या जिल्ह्याला महत्व आहे. २०१९ च्या निवडणुकीत एकसंघ असलेल्या शिवसेनेचे पाच, भाजपचे नऊ, मनसेचा एक, राष्ट्रवादीचे दोन आणि सपाचा एक आमदार निवडून आला होता. २०२२ नंतर बदललेल्या राजकीय समिकरणामुळे सध्याच्या घडीला शिवसेना शिंदे गटाकडे पाचही आमदार आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडे एकही आमदार नाही. तर राष्ट्रवादीच्या दोन आमदारांपैकी प्रत्येकी एक-एक आमदार शरद पवार आणि अजित पवार गटाकडे आहे.

१५ हजारहून कमी मताधिक्यांनी जे उमेदवार निवडून आले किंवा ज्यांनी सर्वाधिक मताधिक्य घेतले त्या मतदारसंघाची परिस्थिती बदलली आहे. शिवसेना, राष्ट्रवादीच्या फुटीमुळे जिल्ह्यातील भाजप आमदारांची संख्या कायम असली तरी काहींना यंदाचा ‘पेपर’ जड जाण्याची शक्यता आहे. विशेषतः कल्याण ग्रामीण, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि उल्हासनगर या चार विधानसभा मतदरसंघांत विद्यमान आमदारांचे मताधिक्य कमी होते, तेथे लोकसभा निवडणुकीनंतर धोका अधिक संभवण्याची शक्यता आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजू पाटील ९३,९२७ मते घेऊन निवडून आले. शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांना ८६,७७३ मते मिळाली होती. विजयाचे अंतर केवळ ७,१५४ इतके होते. राजू पाटील यांचा मतदार बांधलेला आहे. पण शिंदे गटानेही जर उमेदवार दिला तर शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडू शकते. राजू पाटील यांना ही शिवसेना शिंदे गटाची अप्रत्यक्ष मदतही ठरू शकते.

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात २०१९ साली भाजपचे कुमार आयलानी आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांना ४३,६६६ मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांना दुसर्‍या क्रमांकाची ४१,६६२ मते मिळाली होती. दोघांच्या मतांमधील अंतर केवळ १,८६३ इतकेच होते. अगदी निसटता पराभव कलानी कुटुंबाच्या वाट्याला आला होता. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत येथे राजकीय गणित बदलण्याची शक्यता दाट आहे. ओमी कलानी यावेळी निवडणूक लढवणार असल्याचे संकेत आहेत. कलानी कुटुंबीयांनी लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना मदत केली होती. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी सध्या डेंजर झोनमध्ये आहेत.

शिवसेनेचे रुपेश म्हात्रे २०१४ साली युती तुटलेली असतानाही भिवंडी पूर्व मतदारसंघातून निवडून आले होते. २०१९ साली युती असताना रुपेश म्हात्रे यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख यांना विजयाची लॉटरी लागली. २०१९ साली झालेल्या निवडणुकीत त्यांना ४५,५३७ तर रुपेश म्हात्रे यांना ४४,२२३ मते मिळाली. म्हणजे केवळ १,३१४ मतांचा फरक होता. २०२४ ला होणार्‍या विधानसभा निवडणुकीत येथे मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा हा पूर्वपार मतदारसंघ आहे. रुपेश म्हात्रे यांनी शिवसेना ठाकरे गटाशी नाळ जोडून ठेवली आहे. त्याचा फायदा त्यांना यावेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून रुपेश म्हात्रे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा विजय सुकर समजला जातो. पण इथेच सर्व गोम आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बाळया मामा म्हात्रे यांना विजयाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. पण आता राष्ट्रवादी शरद पवार गटासह काँग्रेसही येथे निवडणूक लढवण्यास इच्छूक इाहे. त्यामुळे आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीचा चेहरा अजून ठरलेला नाही. आयत्यावेळी शिवसेना शिंदे गट कोणतीही खेळी करू शकते. त्यामुळे सध्या या मतदारसंघाबाबत कोणतेही भाकीत करणे शक्य नसले तरी सपाचे रईस शेख यांना विजय कायम राखून ठेवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल इतके मात्र निश्चित समजले जाते.

भिवंडी पश्चिम मतदारसंघात २०१४ साली मोदी लाटेत युती फिस्कटली आणि भाजपचे महेश चौघुले निवडून आले. चौघुले यांना ४२,४८३ मते मिळाली. २०१९ साली झालेल्या निवडणुकीत चौघुले यांच्या मतांमध्ये वाढ झाली आणि त्यांना ५८,८५७ मते मिळाली. पण अपक्ष उमेदवार असलेल्या गुड्डू खालीद यांनी त्यांना कडवी झुंज दिली. या दोघांमधील मतांचे अंतर १४,९१२ इतके होते. एका अपक्षाने भाजपच्या विद्यमान आमदाराला घाम फोडल्याने ही निवडणूक महत्वाची मानली गेली. २०२४ मध्येही ही लढाई भाजप आणि आमदार महेश चौघुले यांच्यासाठी तितकीच कठीण मानली जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व सहा विधानसभांपैकी सर्वात कमी मते या मतदारसंघातून मिळाल्याने कपिल पाटील यांच्या विजयाची हॅट्रीक हुकली. त्यामुळे येथे भाजपचे वर्चस्व कमकुवत झाले असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ही संधी राष्ट्रवादी शरद पवार गट साधणार असल्याचे दिसते. काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा ठोकला आहे.