एमसीएचआयचे प्रॉपर्टी प्रदर्शन फार्मात

ठाणे: `क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’ यांच्या वतीने शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेल्या `गृह उत्सव : प्रॉपर्टी २०२४’ प्रदर्शनाला नागरिकांची पसंती मिळत असून, दुसऱ्या दिवशी घर घेणाऱ्या इच्छूक कुटुंबांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली.

ठाणे शहरातील मध्यवर्ती भागापासून निसर्गसौदर्य लाभलेल्या परिसरातील घरांचा प्रदर्शनात समावेश आहे. त्यात परवडणाऱ्या घरांपासून उच्च जीवनशैलीतील घरे नागरिकांना पाहावयास उपलब्ध आहेत. यंदाच्या २१ व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाला दोन दिवसात मिळालेल्या वाढत्या प्रतिसादावरून, २० हजारांहून अधिक कुटुंबे भेट देतील, अशी आशा `क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर पुढील वर्षभरात ठाणे शहरातील घरांच्या मागणीवर शिक्कामोर्तब होईल, असे श्री. मेहता यांनी सांगितले.

यंदा प्रॉपर्टी प्रदर्शनात प्रथमच विविध मनोरंजक व ज्ञानवृद्धीचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील महत्वपूर्ण `महारेरा’ कायद्याच्या माहितीसाठी सीए अश्विन शाह यांचे व्याख्यान काल शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. त्याला ग्राहकांचा प्रतिसाद लाभला. त्यातून महारेरा कायद्याबरोबरच घरखरेदीच्या दृष्टीने उपयोगी माहिती मिळाली, असे अध्यक्ष श्री. मेहता यांनी सांगितले. ठाणे शहरात घरखरेदी करण्यापूर्वी ठाणे शहराच्या परिसराची माहिती मिळावी, यासाठी ग्राहकांना आभासी हेलिकॉप्टर राईड घडविण्यात येत आहे. त्यातून ठाणेकरांना ठाण्याचे विहंगम दृष्य अनुभवता येईल.