मर्जिया पठाण राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी

ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक कार्यात आघाडीवर असलेल्या आणि नागरी समस्यांच्या निपटाऱ्यासाठी लढणाऱ्या मर्झिया शानू पठाण यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पठाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी विरोधीपक्ष नेते अश्रफ पठाण, शमीम खान हे देखील उपस्थित होते.

मर्झिया पठाण या गेल्या काही वर्षांपासून सबंध ठाणे शहरात लढाऊ कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. पाणी, कचरा, आरोग्य, महिला अत्याचार आदी प्रश्नांवर त्या सातत्यपूर्ण लढा उभारत आल्या आहेत. मधल्या काळात त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे मुंब्रा आणि ठाणे शहरातील अनेक समस्यांचा निपटारा झाला होता. उच्चशिक्षित असलेल्या मर्झिया पठाण यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन शासनाशी संघर्ष करीत आहेतच; शिवाय, विद्यार्थी आणि तरूणांमध्ये संविधानाप्रति जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमही आयोजित केले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवारचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीवकुमार झा यांनी मर्झिया पठाण यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली. आज शरद पवार आणि डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पठाण यांना नियुक्तीपत्र दिले.

दरम्यान, यावेळी मुंब्रा, कौसा, ठाणे, आदी भागातील अनेक तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.