मालविका बनसोड हिचा ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमध्ये सत्कार

ठाणे : बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन आयोजित सुपर 1000 सिरीज या स्पर्धेत संपूर्ण जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू सहभाग घेण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतात. या स्पर्धेत भारताकडून मालविका बनसोड या खेळाडूने आपल्या कामगिरीने आणि प्रत्येक विजयाने केवळ भारतीय बॅडमिंटन प्रेमीच नाही तर संपूर्ण जगात वाहवा मिळवली आहे.

मालविका हिने केवळ सुरुवातीच्या सामन्यात उत्तम खेळाडूच नाही तर जागतिक क्रमवारीत ७व्या आणि ३१व्या स्थानी तसेच सर्व दृष्टीने अग्रगण्य असणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना नमवून या ठाणेकर खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे.

याचेच औचित्य साधून ठाणे बॅडमिंटन अकॅडमी मध्ये मालविकाचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त ठाणे महानगर पालिका, ठाणे संदीप माळवी हे मुख्य अतिथी होते. आणि तोंड भरून कौतुक करीत त्यांनी मालविका बनसोड हिचा विशेष सत्कार केला. त्याचप्रमाणे यापुढे स्पर्धात्मक स्तरावर दर्जा टिकवण्यासाठी अर्थात सराव तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी लागेल ती मदत आपण राज्य तसेच महापालिकेच्या वतीने करू अशी हमी देखील दिली.

ठाणे बॅडमिंटन अकॅडमीला गेली अनेक वर्ष वारंवार आणि सातत्याने श्री. वि.टी. डोलवानी यांच्या टेक्सन्स लिमिटेड कंपनीने देखील मालविका बनसोड हिच्या कामगिरीची दखल घेऊन तिला याप्रसंगी गौरवीत रुपये २५ हजार इतकी भेट देऊन कौतुक केले. टेक्सन्स कंपनीचे जनरल मॅनेजर श्री. उन्नीकृष्णन आणि एच आर प्रमुख इंद्रायणी या सत्कार सोहळ्यात उपस्थित राहून मालविकाचे तसेच तिने आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे सर्व कोचेस आणि मुख्य श्रीकांत वाड यांच्यावर स्तूतीसुमनांचा वर्षाव केला आणि यापुढे देखील आपण असेच उत्तम दर्जाचे खेळाडू घडवून ठाणे तसेच महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण भारताचे नाव बॅडमिंटन जगात मोठे करू याबद्दल आम्हाला विश्वास आहे असे आवर्जून नमूद केले.

याप्रसंगी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे प्रमुख श्रीकांत वाड तसेच ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत भागवत आणि श्री. गणपुले यांच्या समवेत संदीप कांबळे, विघ्नेश देवळेकर हे उपस्थित होते.