मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर घणाघात
अंबरनाथ : महाविकास आघाडी म्हणजे थापाड्यांची आघाडी आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीचा महायुतीचा वचननामा चोरून आमच्याच सगळ्या योजना नागरिकांना सांगत सुटले आहेत. मी डॉक्टर नसलो तरी दोन वर्षांपूर्वी राज्यात मोठी राजकीय शस्त्रक्रिया केली. आता दंतचिकित्सक असलेल्या डॉ. बालाजी किणीकर यांनी विरोधकांचे दात घशात घालावेत,असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
महायुतीचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांच्या आज बुधवार (१३) अंबरनाथला झालेल्या प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेस, जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. पक्ष आणि चिन्ह चोरल्याचा आरोप करतात त्या खेळण्याच्या वस्तू आहेत काय असा खोचक टोला त्यांनी लगावला. मशालीने घरोघरी आगी लावण्याचे काम केले, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधल्यामुळे आपण उठाव केला आणि महाआघाडी सरकार उलथवून टाकले. त्या ५० आमदारांमध्ये बालाजी किणीकर देखील होते, अडीच वर्षात सगळी बंधने झुगारून महायुतीच्या माध्यमातून राज्यात विविध विकास योजना आणल्या त्या योजनांनाही विरोधकांनी विरोध केला. लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी विश्वास दाखवला त्यांमुळे सात खासदार विजयी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यातून राज्यात विकास कामे करून महाराष्ट्र एक नंबरचे राज्य केले. लाडकी बहीण योजनेसह अन्य योजनांमुळे महिलांसह, विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिकांना समाधान देण्याचे काम केले. त्यामध्ये कोणताही भेदभाव केला नाही, महायुतीचे सरकार देणारे आहे, घेणारे नाही, अशा शब्दात त्यांनी विपक्षांची खिल्ली उडवली.
किणीकर यांना पुन्हा आमदार करण्यासाठी पुन्हा महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे. त्यासाठी किणीकर यांचा विजय म्हणजे एकनाथ शिंदे यांचा विजय होईल, सरकार महायुतीचे आले तरच विकास होणार त्यादृष्टीने किणीकर यांना संधी देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले.
लोकनगरी परिसरात झालेल्या सभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या १५ वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती दिली. किणीकर यांनी देखील आमदारकीच्या कालावधीत अंबरनाथचा कायापालट केल्याचा दावा खा. डॉ. शिंदे यांनी केला. किसन कथोरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे डॉ. बालाजी किणीकर यांचीही यावेळी भाषणे झाली. शिवसेनेचे पदाधिकारी, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.