ठाणे : लाडकी बहिण योजनेसह अनेक योजनांना एकीकडे विरोध करून दुसरीकडे महाविकास आघाडीने महायुतीचा वचननामा चोरल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रचार रॅलीत विरोधकांवर तोफ डागली. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे भक्कम सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना एकनाथ शिंदेब्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यांनंतर संपूर्ण राज्यात निवडणूक प्रचाराचा धडाका त्यांनी लावला असताना त्यांच्या मतदारसंघात प्रचाराची धुरा मात्र त्यांच्या विश्वासू शिलेदारांनी खांद्यावर घेतली होती. खासदार नरेश म्हस्के, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे हे यासाठी मेहनत घेत आहेत. मात्र आज मतदारांना आवाहन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मतदरसंघामध्ये जोरदार प्रचार रॅली काढली.
मुख्यमंत्र्यांच्या रॅलीवर ठिकठिकाणी जेसीबीतून पुष्पवृष्टी होत असल्याचे पहायला मिळाले. या रॅलीत कार्यकत्यांसह शेकडो महिलाही सहभागी झाल्या होत्या. रॅली सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीने त्यांच्या वचननाम्यामध्ये लाडक्या बहिणीला तीन हजार आणि बेरोजगारांना चार हजार रुपये देण्याचे वचन दिले आहे. यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांनी महायुतीचा जाहिरनामा चोरल्याचे सांगितले. तसेच आम्ही कल्याणकारी योजना राबवल्या आहेच पण विकास कामांचा अडीच वर्षांचा धडाका पाहून राज्यातील जनता महामताधिक्याने महायुतीलाच कौल देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.