भिवंडीत पाच एकरात उभे राहतेय शिवरायांचे मंदिर

आमदार संजय केळकर यांनी केली पाहणी

ठाणे: भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा गावात शिवभक्त राजू चौधरी यांच्या संकल्पनेतून सुमारे पाच एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर उभे राहत असून आज त्यास भेट देत आमदार संजय केळकर यांनी पाहणी केली. यावेळी श्री.चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले.

छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात शिवजन्म ते शिवराज्याभिषेक प्रवासाचे चित्रण तैलचित्रांच्या माध्यमातून करण्यात येत असून ती दृश्य जिवंत असल्याचा भास पाहणाऱ्यास होत असतो.

ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी आज भेट देऊन मंदिराची पाहणी केली, भारतातील छत्रपती शिवाजी राजांचे हे पहिलेच मंदिर असेल असे यावेळी राजू चौधरी यांच्याकडून सांगण्यात आले. मंदिराची भव्यता पाहून श्री.केळकर भारावून गेले. त्यांनी या भव्य शिवकार्याला शुभेच्छा देऊन लोकार्पण सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी विकास पाटील आणि या उपक्रमात सहभागी झालेली मंडळी उपस्थित होती.