१८० जणांना अटक, २७९ गुन्हे दाखल
ठाणे: विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या धाडीमध्ये 21 दिवसात तब्बल एक कोटी रुपयांचे मद्य जप्त केले आहे. हा मद्य साठा जप्त करण्याबारोबरच 180 जणांना यामध्ये अटक देखील करण्यात आली असल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून १५ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागातील पथकाने रसायन, हातभट्टी, देशी मद्य, विदेशी मद्य, बिअर, वाईन, शॅम्पेन, ताडी आदी मुद्देमालांवर कारवाई केली.
ठाणे जिल्ह्यात खाडीकिनारी गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. भरारी पथकाकडून ९२ भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक प्रवीणकुमार तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली असून या पथकात एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, चार कॉन्स्टेबल, एक वाहक अशा आठ जणांचा समावेश आहे.
फ्लाईंग स्कॉर्डची विशेष नजर
निवडणुकीच्या काळात परराज्यातील मद्य चोरून आणले जाते. गोवा, दमण तसेच गुजरात येथून येणाऱ्या खाजगी बसेसवर फ्लाईंग स्कॉडची विशेष नजर ठेवण्यात आली आहे. पडघा, मुंब्रा बायपास आणि खारघर टोल नाका या तीन ठिकाणी तपासणी नाके निर्माण केले आहेत. अवैध मध्य तक्रार असल्यास १८००२३३९९९९ यावर संपर्क करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे अधिक्षक प्रवीणकुमार तांबे यांनी केले आहे.