भिवंडीतून ८०० कोटींचे लिक्विड एमडी ड्रग्ज जप्त; दोघांना अटक

गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाची कारवाई

ठाणे : गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) भिवंडी-वाडा मार्गावर एका मेफेड्रोन (एमडी ड्रग्ज) उत्पादन युनिटवर छापा टाकून तब्बल ८०० किलोचे लिक्विड मेफेड्रोन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत ८०० कोटी रुपये आहे.

गुजरातेतील भरुच जिल्ह्यातील एका फार्मा कंपनीवरही एटीएसने धाड टाकून ३१ कोटींचे लिक्विड ट्रामाडोल जप्त केले. या कारवाई चार जणांना अटक करण्यात आली आहे.

गुजरात एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी ५ ऑगस्ट रोजी भिवंडीतील युनिटवर धाड टाकली. तिथे लिक्विड मेफेड्रोन ड्रग्जची निर्मिती केली जात होती. या कारवाईत एटीएसने मोहम्मद युनुस शेख (४१) आणि त्याचा भाऊ मोहम्मद आदिल शेख (३४) या दोघांना अटक केली. या दोन्ही भावांनी आठ महिन्यांपूर्वी एक फ्लॅट भाड्याने घेत विविध रसायनांचा वापर करत मेफेड्रोनची निर्मिती सुरू केली होती. त्यांचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला होता. मात्र, आता त्यांनी लिक्विड स्वरूपातील मेफेड्रोन बनविण्यात यश मिळविले होते, अशी माहिती गुजरात एटीएसचे पोलिस उपमहानिरीक्षक सुनील जोशी यांनी दिली.

गुजरातमध्ये सुरत हद्दीतील पलसाना येथील करेली गावात मेफेड्रोन (एमडी) उत्पादन सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. १८ जुलै रोजी येथून तिघांना अटक करत त्यांच्याकडून ६१ कोटींचा कच्चा माल हस्तगत केला होता. या युनिटवर सुरू असलेल्या तपासादरम्यान एटीएसला भिवंडी येथील शेख बंधूंची आणि एमडी साठ्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गुजरात एटीएसने आपला मोर्चा भिवंडीकडे वळवला. विशेष म्हणजे या कारवाई संदर्भात स्थानिक पोलीस प्रशासनाला कोणतीही माहिती नसल्याचे समोर येत आहे.