उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
कल्याण: दुर्गाडीचा निकाल जसा मिळाला तसा मलंगगडाचा देखील निकाल मिळेल. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
मलंगमुक्तीच्या आंदोलनासाठी एकनाथ शिंदे हे मलंगगड येथे आले असता यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधताना त्यांनी हे सांगितले. कल्याण नजीक असलेल्या श्री मलंगगड येथे माघी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी प्रथेप्रमाणे आयोजित करण्यात येत असलेल्या श्री मलंगगड उत्सवाला एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून श्रीमलंग मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन घेऊन मनोभावे महाआरती केली.
‘हिंदूंची वहिवाट हीच मलंगगड मुक्तीची पहाट’ असा नारा देऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्नाखाली धर्मवीर आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला होता. बाळासाहेबांचा आणि दिघे यांचा हाच वारसा पुढे नेत सर्व शिवसैनिक आजही हा उत्सव तितक्याच उत्साहात आणि जल्लोषात साजरा करत असल्याचे मत यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना शिंदे यांनी व्यक्त केले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ही यात्रा त्याच उत्साहात सुरू आहे. बाळासाहेबांच्या आदेशाने आनंद दिघे यांनी हे सुरू केलेले आंदोलन आहे. त्यांनी सुरू केलेले उपक्रम आणि आंदोलने सुरू आहेत. त्यांच्या आशिर्वादाने सरकार आले. मुख्यमंत्री असतांना अनेक कामं केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण, भाऊ, शेतकरी या सारख्या योजना अखंडपणे सुरू राहतील असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तसेच कल्याण, डोंबिवलीतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते.