ठाणे : सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत शुक्रवारी ७ जून रोजी काढली जाणार आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे यंदा देखील संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. या ऑनलाइन अर्जासाठी ४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. या प्रक्रियेअंतर्गत ठाणे जिल्ह्यात ११,३७७ जागासाठी एकूण १९,५९४ अर्ज प्राप्त झाले आहेत अशी माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी दिली.
या प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत लॉटरी शुक्रवार, ७ जून रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे काढण्यात येणार आहे सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे. सन २०२४-२५ वर्षासाठी आरटीई २५ प्रवेश सोडत (लॉटरी) कार्यक्रमाचे प्रक्षेपण https://youtube.com/live/bNqUW9iKSX0?feature=share या लिंकवर उपलब्ध होईल.