स्व. रामचंद्र ठाकूर तरण तलाव लवकरच होणार खुला

मनसेच्या पाठपुराव्याला यश

ठाणे : लोकमान्य सावरकर प्रभाग समिती क्षेत्रातील लोकमान्य पाडा नं. १, आकृती गृहसंकुलाच्या भुखंडावर बांधण्यात आलेल्या तरण तलावाचे नामकरण करून अडीच वर्ष लोटले तरीही अद्याप हा तरण तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नव्हता. मनसेच्या मागणीनंतर अखेर तरण तलाव दोन महिन्यानंतर सुरू होणार आहे.

महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाने अभिव्यक्ती स्वारस देकार या पध्दतीने हा तलाव खाजगी संस्थेला पाच वर्षाकरिता चालविण्यास देण्यात येणार आहे. खाजगी संस्था सर्व प्रक्रिया पार पाडून २ ते ३ महिन्यांत तरण तलाव सुरू करेल. तरण तलाव विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही तसेच निगा देखभालीकरिता आर्थिक तरतूद नव्हती. रहिवाशांसाठी हा तरण तलाव सुरू झाल्यास नागरिक व जलतरणपटूंचा ठाणे पालिकेच्या मारोतराव शिंदे व रामा साळवी तरण तलाव येथील फेर‍ा टळणार आहे.

लोकमान्य-सावरकर प्रभाग समितीच्या अंतर्गत येणाऱ्या या तलावाचे ”स्व. रामचंद्र ठाकुर तरण तलाव” असे नामकरण करण्यात आले होते. २०१९ ला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी नामकरण करण्यात आले होते. मनसेच्या पाठपुराव्यामुळे येत्या दोन महिन्यानंतर वर्तकनगर, लोकमान्य नगर, शिवाई नगर, शास्त्रीनगर, चिराग नगर, भिमनगर या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना या तरण तलावाचा लाभ घेता येणार आहे.