* कळवा रुग्णालयातील मोठा घोटाळा
* रुग्णांची फसवणुक प्रकरणी एकावर गुन्हा
* १० निवासी डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस
ठाणे: रुग्णालयात औषध नसल्याचे भासवून रुग्णांना खासगी औषधालयातून औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असून त्यावर लाखोंचे कमिशन लाटले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी कळवा रुग्णालयातील १० निवासी डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे तर एका दलालास ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या आरोपी पोलीस कस्टडीत असून अधिक चौकशी सुरू आहे.
शिवशंकर शुक्ला (२४) राहणार भास्कर नगर कळवा असे अटक आरोपीचे नाव आहे. ठाणे महापालिकेचे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी या प्रकरणाबाबत कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी शिवशंकर शुक्ला याने निवासी डॉक्टरांशी संगनमत केले. कक्षसेवक असल्याचे भासवून तो रुग्णालयात वावरत होता. स्वतः किंवा संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याकडून बनावट मेडिकल प्रिस्क्रीप्शन बनवून घेत असे. त्यातील नमूद औषधे किंवा त्यास पर्यायी औषधे रुग्णालयात उपलब्ध असूनही ते नसल्याचे सांगण्यात येऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बाहेरील खासगी औषधालयातून ती औषधे विकत आणायला पाठवत असत. रुग्णांनी बाहेरून ती औषधे विकत घेतली की त्या औषधालायातून मिळणारे कमिशन आरोपी स्वतःसाठी आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास देत असे. यातून दर महिन्यास लाखो रुपयांचे कमिशन लाटले जात असल्याचे बोलले जात असून गोर गरीब रुग्णांना मात्र नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असतो.
गोरगरिबांचे हक्काचे रुग्णालय म्हणून कळवा येथील ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे पाहिले जाते. या रुग्णालयात ठाणे, कळवा, मुंब्रा, भिवंडी यासह विविध शहरातून रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. मागील काही दिवसांपासून एक व्यक्ती रुग्णालयात विना परवानगी कोणत्याही कक्षात वावरत असल्याची माहिती रुग्णालयातील वरिष्ठ डाॅक्टरांकडे प्राप्त झाली होती. त्यानंतर डाॅ. अनिरुद्ध माळगावकर यांनी रुग्णालयातील सर्व सुरक्षा रक्षकांना रुग्णालयात येणाऱ्यांची विचारणा करण्याची सूचना दिली होती. ८ नोव्हेंबरला शिवशंकर शुक्ला नावाच्या व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी पकडले. त्याची रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर चौकशी केली असता, दर आठवड्यातून तीन दिवस तो बाह्य रुग्ण विभागात विना परवाना येत असल्याचे समोर आले. तसेच, येथे तो कक्ष सेवक असल्याचे भासवित होता. त्याने अस्थिव्यंग तसेच इतर कक्षातील कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोऱ्या कागदाच्या चिठ्ठ्यांवर रुग्णालयातील काही डाॅक्टरांच्या फार्मसीध्ये उपलब्ध असलेली औषधे रुग्णांना बाहेरील अज्ञात व्यक्ती औषधालयातून विकत घेण्यासाठी लिहून देत असे. त्या मोबदल्यात औषधालयातून त्याला दलाली मिळत होती. ही औषध रुग्णालयाच्या औषधालयात देखील उपलब्ध असताना तो ती औषधालयातून रुग्णांना विकत घेण्यास भाग पाडत होता. त्याची अधिक चौकशी केली असता, दलालीतून मिळणारी काही रक्कम संबंधित डाॅक्टरांना तो ऑनलाईन पाठवित असल्याचेही स्पष्ट झाले. या घटनेनंतर डाॅ. माळगावकर यांनी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे शिवशंकर शुक्ला यांच्या विरोधात गुन्हे दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान, रुग्णालयातील १० निवासी डॉक्टरांना करबे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्या आरोपीच्या चौकशीतून जे सत्य समोर येईल त्यानंतर डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील डॉ. माळगावकर यांनी दिली.