* २५ टक्क्यांहून कमी पाणीसाठा
* शहरात १० टक्के पाणीकपात कायम
ठाणे : ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघा ९ ते २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कालपासून पडणाऱ्या पावसाने दीडशे मिली मिटरचा पल्ला गाठला असला तरी शहरातील १० टक्के पाणीकपात मात्र आणखी काही दिवस राहणार आहे.
शहराला भातसा, तानसा आणि मध्य वैतरणा या धरणांमधून तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून ४८६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून या धरणांची पाणीपातळी कमी होत चालली असल्याने मुंबई महापालिकेकडून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात १०टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे.
ठाणे शहराला भातसा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणामध्ये सध्या २२६.३१२ क्युबिक लिटर म्हणजे २४.२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोडकसागर धरणात १५.५८टक्के म्हणजे २०.०८९ क्युबिक लिटर पाणीसाठा तर बारवी धरणात २६.५९ टक्के म्हणजे ९०.१०० क्युबिक लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे ठाणे शहरात १०टक्के पाणीकपात सुरु करण्यात आली आहे.
दरम्यान मागील दोन-तीन दिवस पडणाऱ्या पावसाने दीडशेचा पल्ला गाठला आहे. रविवारी रात्री आणि आज सकाळी मुसळधार पाऊस ठाण्यात झाला. आज दुपारपर्यंत ४८.७७ मिमी इतका पाऊस पडला होता तर आत्तापर्यंत १४१.९० मिमी पाऊस पडला आहे. या पावसामुळे वंदना सिनेमा, महाराष्ट्र विद्यालय, पूर्व भागातील बारा बंगलासह आठ ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. या पावसात आज सहा झाडे उन्मळून पडली तर दोन झाडांच्या फ़ांद्या पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.