भाईंदर: ठाणे लोकसभा मतदार संघाच्या १४५ व १४६ विधानसभा मतदार संघातील मतदानासाठी तैनात मीरा-भाईंदर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कामावर हजर नसल्याचे दिसून आले.
महापालिका मुख्यालयात चौथ्या मजल्यासह तळमजल्यावरील जनसंपर्क विभाग व नागरी सुविधा केंद्र विभागातील अधिकारी व कर्मचाऱी मोठ्या प्रमाणात गैरहजर राहिल्याने महापालिकेचे कामकाज ठप्प झाले होते. महापालिकेत कामासाठी आलेल्या नागरिकांना अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याने परत जावे लागले.
आचार संहितेची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात महापालिका अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामासाठी महापालिका कार्यालयातून अदृष्य होण्यास सुरुवात झाली होती. २० मे रोजी लोकसभा निवडणूक झाल्यावर महापालिका कामकाज सुरळीत सुरू होईल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. मात्र महापालिका मुख्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती नसल्याने महापालिकेचे कामकाज ठप्प असल्याचे दिसत होते.
चौथ्या मजल्यावर शहर अभियंता दिपक खांबित व दोन कर्मचारी, तिसऱ्या मजल्यावर अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर व एक लिपिक, दुसऱ्या मजल्यावर आयुक्त दालनात एक सहाय्यक व दोन सफाई कर्मचारी, पहिल्या मजल्यावर अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे व संगणक चालक तळमजल्यावरील जनसंपर्क विभागात सहायक जनसंपर्क अधिकारी जितेंद्र कांबळे व कर्मचारी असे हाताच्या बोटावर मोजण्याएवढे अधिकारी व कर्मचारी उपस्थित असल्याने महापालिकेतील कामकाज ठप्प झाले, परिणामी महापालिकेत आलेल्या नागरिकांना हात हलवत परत जावे लागले.
याबाबत चौकशी केली असता २० मे च्या मतदानासाठी तैनात काही महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना २१ मे रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत थांबावे लागल्याने मंगळवारी सामूहिक गैरहजर राहिल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत शासनाने कोणतीही परवानगी अथवा परिपत्रक काढले नसल्याने मंगळवारच्या सामूहिक गैरहजेरीबाबत कर्तव्य कठोर आयुक्त संजय काटकर कोणती कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आयुक्त संय काटकर स्वतः १३ मेपासून कलकत्ता येधील लोकसभा निवडणुकीत निरीक्षक म्हणून काम पहात असल्याचे आयुक्त दालनातून सांगण्यात आले.