अंबरनाथच्या जंगलात माऊस डियर हरणाची हत्या

वन विभागाकडून एकास अटक

ठाणे : अंबरनाथ एमआयडीसी परिसरात बंदुकीने दुर्मिळ अशा पिसोरा जातीच्या हरणाची शिकार करण्यात आली आहे. प्रकरणी एकाला बदलापूर वन विभागाने अटक केली आहे. अटक केलेल्या तरुणाचे नाव जगदीश वाघ (२५/रा. अंबरनाथ) असे आहे.

न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलिस कस्टडी दिली आहे.
अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी परिसरात गेल्या महिन्यांत एक ‘पिसोरा’ जातीचे हरण जखमी अवस्थेत आढळून आले. बदलापूर वनविभागाने तत्काळ जखमी हरणाला बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन विभागाच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या हरणाला बंदुकीची गोळी लागल्यामुळेच जखमी अवस्थेत जंगलातील उंच उतारावरून खाली पडले असल्याचे निदान झाले. शिकारीच्या उद्देशाने त्याला बंदुकीने गोळी मारल्याचे उघड झाले. याबाबत गुन्हा नोंद झाल्यावर उपवनसंरक्षक सचिन रेपाल आणि सहाय्यक वनसंरक्षक गणेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास केला आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे जगदीश वाघ याला शनिवारी बदलापूर वन परिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे आणि वनपाल वैभव वाळिंबे यांच्या टीमने ताब्यात घेतले आहे.

पिसोरा हरण मोठ्या जंगलात सापडत असून आग्नेय आशिया, दक्षिण आशियापासून मध्य व पश्चिम आफ्रिकेपर्यंत ते आढळतात. आपल्याकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातदेखील या हरणांचे अस्तित्व आहे. हरणांच्या जातींमध्ये ही जात सर्वात लहान असते. पिसोरीचे डोके लहान असते व नाकपुड्या उंदरासारख्या टोकदार असतात. त्यामुळे याला ‘माउस डिअर’असेही संबोधतात.