कल्याण मनसेत खांदेपालट; शहर अध्यक्षपदी प्रकाश भोईर

कल्याण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण शहर मनसेत खांदेपालट केली असून शहर अध्यक्षपदी माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस प्रकाश भोईर यांची नियुक्ती केली आहे.

मनसे पक्षाच्या स्थापनेपासून प्रकाश भोईर हे राज ठाकरे यांच्या समवेत असून २००६ पासून कल्याण शहराचे शहर अध्यक्षपद त्यानंतर २००९ साली कल्याण पश्चिम मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवत आमदार झाले. आपल्या आमदारकीच्या काळात कल्याण शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प राबवले. त्यानंतर भोईर यांची मनसे पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.

मनसेला कल्याणमधून सुरवातीपासून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र गेल्या काही वर्षात संबंधित पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मनसे पक्षाला उतरती कळा लागली आहे. अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेता पक्षाला लागलेली गळती थांबविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देत पक्षाला उभारी आणण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खांदेपालट करत प्रकाश भोईर यांची कल्याण शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र राज ठाकरे यांनी भोईर यांना दिले असून यावेळी मनसे आमदार राजू पाटील, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.