कल्याण लोकसभा मतदारसंघाने पुसला कमी मतदानाचा शिक्का

सोमवारी ५०.१२ टक्के मतदान

कल्याण : संपूर्ण महाराष्ट्रात कमी मतदान होत असते असा शिक्का कल्याण लोकसभा मतदार संघावर बसलेला आहे. मात्र सोमवारी पार पडलेल्या कल्याण लोकसभा निवडणुकीच्या मतदानात ५०.१२ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

कल्याण लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदान कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातून ५२.१९ टक्के झाले तर सर्वात कमी मतदान अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातून  ४७.०६ टक्के इतके झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली आहे.

विशेष म्हणजे गत २०१९ सालच्या कल्याण लोकसभेच्या निवडणुकीत ४६.१६ टक्के मतदान झाले होते. सोमवारी पार पडलेल्या २०२४ च्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी ५०.१२ इतकी झाल्याने मतदानाच्या टक्केवारीत ३.९६ टक्क्याने वाढ झाल्याने शासनाने व पालिका प्रशासनाने मतदान टक्केवारीसाठी जनजागृतीचे विविध राबविलेल्या उपक्रमाला यश आल्याचे दिसून आले आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघातील २००९ साली ३४ टक्के, २०१४ मध्ये ४० टक्के आणि २०१९ मध्ये या मतदार संघातील ४७.०१ टक्के मतदारांनीच मतदान केले.
सोमवारी २० मे २०२४ रोजी पार पडलेल्या मतदानात कल्याण लोकसभेतील १० लाख ४३ हजार ६१० मतदान केल्याने मतदानाची आकडेवारी ५०.१२ टक्के इतकी झाल्याने गत २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा ३.११ टक्के इतकीच वाढ झाली आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघातील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि कळवा-मुंब्रा या सहा विधानसभा क्षेत्रातील मिळून एकूण २० लाख ८२,२२१ मतदार संख्या आहे. सोमवारी झालेल्या मतदानात अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील एकूण तीन लाख ५३,५५४ मतदारांपैकी एक लाख ६६,४०७ मतदारांनी ४७.०६ टक्के मतदान केले. उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातील एकूण दोन लाख ५७,३६७ मतदारांपैकी एक लाख ३१,५०५ मतदारांनी ५१.०९ टक्के मतदान केले. कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील एकूण दोन लाख ९९,३८० मतदारांपैकी एक लाख ५६,२३५ मतदारांनी ५२.१९ टक्के मतदान केले. डोंबिवली विधानसभा क्षेत्रातील एकूण दोन लाख ७५,११० मतदारांपैकी एक लाख ४२,१४२ मतदारांनी ५१.६६ टक्के मतदान केले. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील एकूण चार लाख ५३,१४९ मतदारांपैकी दोन लाख ३१,१६२ मतदारांनी ५१.०१ टक्के मतदान केले. कळवा-मुंब्रा  विधानसभा क्षेत्रातील एकूण चार लाख ४३,६६१ मतदारांपैकी दोन लाख १६,१५९ मतदारांनी ४८.७२ टक्के मतदान केले.