कल्याण : भारत सरकार गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय मार्फत सन २०२३ या वर्षात शहरातील महापालिका अधिकारी, पोलिस अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचेसाठी फ्रिडम टू वॉक, रन अँड सायकल हे अभियान आयोजित केले होते. शहरातील नागरीकांमध्ये आरोग्यासाठी आवश्यक चालणे, धावणे व सायक्लिंग करणे याबाबत जनजागृती व त्यादृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा शहरात निर्माण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
या अभियानात अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, कल्याण स्मार्ट सिटी सी.ई.ओ. प्रल्हाद रोडे, सत्यवान उबाळे, मुख्य लेखा अधिकारी, सुधाकर जगताप, उप आयुक्त, प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता (विद्युत), अजित देसाई, सहाय्यक अभियंता, अनिल तामोरे, गार्डन पर्यवेक्षक, उमेश माने, पोलिस उप आयुक्त, उमेश गिते, वाहतूक पोलिस निरिक्षक व आनंद गायकवाड, पोलिस निरिक्षक यांनी सहभाग घेतला होता.
दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते १७ मार्च २०२३ च १५ जुन २०२३ ते ३० जुलै २०२३ या दोन टप्यात प्रत्येकी ४५ दिवस कालावधीसाठी अभियान होते.
कल्याण डोंबिवलीच्या चमूने पहिल्या टप्यात ४५ दिवसांत सायकलींग श्रेणीमध्ये ८२५४ किलोमीटर, चालणे श्रेणीमध्ये २०३६ किलोमीटर व रनिंगमध्ये १४८३ किलोमीटर पार करताना या तीन वर्गात सुवर्ण पारितोषिक पटकावले आहे. तसेच व्यक्तिगत श्रेणीमध्ये ४५ दिवसांत ४७५० किलोमीटर सायकलींग करत दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त यांनी देशभरात तिसरा क्रमांक, अजित देसाई, सहाय्यक अभियंता यांनी धावणे या श्रेणीत ११४३ किलोमीटर रनिंग करुन प्रथम क्रमांक व अनिल तामोरे, गार्डन पर्यवेक्षक यांनी चालणे या श्रेणीत ९८७ किलोमीटर वॉक करुन तिसरा क्रमांक पटकवला आहे.
दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी पिंपरी चिंचवड येथे ग.दी. माडगुळकर सभागृहात स्ट्रीट अॅन्ड पब्लिक स्पेसेस या विषयावर झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत कल्याण डोंबिवली शहराला ७ राष्ट्रीय पुरस्कार कुणाल कुमार, सह सचिव व डायरेक्टर स्मार्ट सिटी मिशन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्कार स्विकारण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता (विद्युत), संदीप तांबे, उप अभियंता (स्मार्ट सिटी), अजित देसाई सहाय्यक अभियंता व अनिल तामोरे, गार्डन पर्यवेक्षक उपस्थित होते.