विकास आराखड्याच्या सुनावणीत नागरिकांची मागणी
ठाणे: ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यातील खारीगांवमधून जाणारा नियोजित रस्ता तसेच कळव्यातील एनएनएम सोसायटीमधून जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाला नागरिकांनी विरोध केला आहे.
कळव्यातील सुदामा, त्रिमूर्ती, एनएम सोसायटी आणि सह्याद्री अधिकृत इमारतीच्या परिसरातून रस्त्याचे आरक्षण टाकले आहे. त्यामुळे या विकास आराखड्याला नागरिकांचा विरोध आहे. स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या परिसरात जाऊन संतप्त नागरिकांची भेट घेतली होती.
महापालिकेचा नवीन विकास आराखडा कळवा-खारीगावला उद्ध्वस्त करणारा असल्याचा आरोप करत रस्त्याच्या आरक्षणाला आ.आव्हाड यांनी विरोध केला होता.
दुसरीकडे खारीगाव येथील प्रस्तावित डीपी रोड भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा असून स्वातंत्र्यसैनिकांच्या घरावर, १७ रहिवासी इमारतींवर आणि जरीमरी ग्रामदेवतेच्या मंदिरावर बुलडोजर फिरविण्याचा घाट या डीपी रोडच्या माध्यमातून घालण्यात आला असल्याचा आरोप खारीगांवमधील गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या रस्त्याला देखील नागरिकांनी यापूर्वीच विरोध केला आहे.
सोमवारी विकास आराखड्यातील या दोन्ही नियोजित रस्त्यांच्या संदर्भात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीच्या दरम्यान स्वतः आमदार जितेंद्र आव्हाड आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे दोन्ही रस्ते स्थानिकांना उद्ध्वस्त करणारे असून ते रद्द करण्याची मागणी गावकऱ्यांनी सुनावणीच्या दरम्यान केली.