बाजारात जुन्नर हापूस दाखल

नवी मुंबई : मे महिन्याच्या अखेरीस कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम संपण्याच्या वाटेवर असताना वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात जुन्नर आंबा दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

बाजारात सध्या जुन्नर आंब्याच्या रोज ३ ते ४ गाड्या दाखल होत असून या आंब्याला ५०० ते ९०० रुपये प्रती डझन दर आहेत. फळ बाजारात कोकणातील उन्हाळी हापूस हंगाम संपताच पावसाळी फळांच्या हंगामाला सुरुवात होते. त्यामुळे बाजारात सध्या केशर, निलम, तोतापुरी, राजापुरी, बलसाड, आंबे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

मे अखेरीस बाजारात जुन्नर हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. मात्र सध्या बाजारात कमी प्रमाणात जुन्नर हापुस दाखल होत असून जूनमध्ये आवक वाढेल. अवकाळी पावसामुळे यंदा छाटणी उशिराने झाली, त्यामुळे बाजारात जुन्नर आंबे दाखल होण्यास विलंब होत असून १० जूननंतर बाजारात जुन्नर हापूस वाढणार आहे. सध्या बाजारात जुन्नर हापूसच्या ३ ते ४ गाड्या दाखल होत आहेत. जुन्नर हापूस प्रति डझन ५००-९०० रुपयांनी विक्री होत आहे, अशी माहिती फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली.