आयटीआय इमारत धूळ खात पडून

…अन्यथा शासकीय कार्यालय सुरु करण्याची मागणी

शहापूर: मागील चार वर्षांपासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असतांना ही इमारत तब्ब्ल चार वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. नवीन इमारतीत आयटीआयचे वर्ग सुरु करावेत, अन्यथा इमारतीत शासकीय कार्यालय सुरु करावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहापूर तालुका संपर्क प्रमुख विजय देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तहसीलदार परमेश्वर कासुले यांच्याकडे केली आहे.

विद्यार्थ्यांचे व्यावसायिक शिक्षणाचे हीत लक्षात घेता शहापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्व. रमेश अवसरे यांनी ग्रामपंचायतीच्या मालकीची सरकारी गोडावूनशेजारील सहा एकर जागा विनामोबदला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला इमारत बांधण्यासाठी दिली. ही जागा शहापूर शहराचा कचरा टाकण्याची होती. पंरतु शहापूर शहरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था होऊन तालुक्यातील विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन चांगल्या कंपनीत नोकरीला लागतील या भावनेने तब्ब्ल सहा एकर जागा दिली. पंरतु तेथे असलेली अपुरी प्रशिक्षण व्यवस्था व चुकीच्या आरक्षण पध्दतीमुळे शहापूरच्या विद्यार्थ्यांना म्हणावा तसा फायदा होताना दिसत नाही. येथे असलेल्या प्रशिक्षण संस्थेत शिक्षक व कोर्सेस अत्यंत कमी आहेत. कोविड काळात म्हणजे सन २०१९ ला जुन्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाजूलाच गरज नसताना शासनाच्या करोडो रूपयांचा चुराडा करून नविन सुसज्ज इमारत बांधली आहे. मात्र चार वर्षात या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकसुध्दा प्रशिक्षण वर्ग चालू केलेला नाही. या इमारतीचा वापर करायचा नसेल तर तिथे तहसील कार्यालय सुरु करावे अथवा शहापूर नगर पंचायत कार्यालय सुरु करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.