मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या विकास कामांमध्ये बाधित होणाऱ्या भूमिपुत्रांवर अन्याय होऊ न देता विकास केला जाईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी एम.एम.आर.डी.ए.चे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त अश्विन मुद्गगल तसेच मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये मोघरपाडा कार डेपोमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा झाली. तसेच गायमुख ते फाऊंटन व गायमुख ते दहिसर चेक नाका दरम्यान होणाऱ्या ६० मीटर लांबीच्या रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बरोबर देखील प्रशासनाने चर्चा केली. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे! तसेच रस्त्याचे विभाजन मध्यभागापासून करण्यात यावे या प्रमुख मागण्या एम.एम.आर.डी.ए. प्रशासनाने मान्य केल्या. याशिवाय डोंगरी कार शेड व तिथून होणाऱ्या रस्त्या संदर्भात देखील चर्चा झाली. या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी सदर रस्ता हा कमीत कमी बाधित क्षेत्रातून पर्यायी मार्गाने व्हावा, अशी मागणी केली. तसेच कार शेड प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या व ख्रिश्चन समुदायाचे श्रद्धास्थान असणाऱ्या ” फातिमा माता तीर्थस्थळाचा सन्मान राखून त्याचा विकास करण्याचे देखील निश्चित करण्यात आले.
यावेळी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण होत असून या संबंधित पिण्याच्या पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील जास्तीत लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल, असे नियोजन करावे असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.
या बैठकीला दोन्ही महापालिकेचे अधिकारी एम.एम.आर.डी.ए.चे अधिकारी यांच्याबरोबरच प्रकल्पामुळे बाधित होणारे भूमीपुत्र देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.