टी-२० विश्वचषक विजेते न्यूझीलंड खेळणार भारताविरुद्ध एकदिवसीय सामना 

आयसीसी महिला टी-२० विश्वचषक संपन्न झाला आहे आणि आता भारतीय महिला क्रिकेट संघ त्या विश्वचषकात विजयी झालेल्या न्यूझीलंड संघाशी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि न्यूझीलंड गुरुवारी अहमदाबाद येथे या मालिकेतील पहिला सामना खेळतील. सर्व सामने अहमदाबादमध्येच खेळवले जातील.

 

आमने-सामने

भारत आणि न्यूझीलंडने एकमेकांविरुद्ध ५४ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने २० जिंकले आहेत आणि न्यूझीलंडने ३३ जिंकले आहेत. भारतात खेळल्या गेलेल्या २० एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने १० आणि न्यूझीलंडने नऊ जिंकले आहेत.

 

संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दयालन हेमलता, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), उमा चेत्री (यष्टीरक्षक), सायली सातघरे, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, तेजल हसबनीस, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, राधा यादव, श्रेयंका पाटील

न्यूझीलंड: सोफी डीव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, लॉरेन डाउन, इझी गेज (यष्टीरक्षक), मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, पॉली इंग्लिस (यष्टीरक्षक), फ्रॅन जोनास, जेस कर, अमिलिया कर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हॅना रो, लीआ तहुहू

 

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

हरमनप्रीत कौर: चांगल्या फॉर्मच्या जोरावर भारताची कर्णधार या एकदिवसीय मालिकेत उतरणार आहे. नुकत्याच संपलेल्या टी-२० विश्वचषकात तिने चार सामन्यांत १५० धावा केल्या आणि तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती.

दीप्ती शर्मा: एकदिवसीय सामन्यांमध्ये २०००हून अधिक धावा आणि १००हून अधिक विकेट्ससह, ही भारताची अष्टपैलू खेळाडू बॅट आणि चेंडूने महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. ती डाव्या हाताची मधल्या फळीतील फलंदाज आणि उजव्या हाताची ऑफ स्पिन गोलंदाज आहे.

अमिलिया कर: न्यूझीलंडच्या या अष्टपैलू खेळाडूने नुकत्याच संपलेल्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकात मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. तिने बॅट आणि चेंडूने जबरदस्त कामगिरी केली. तिने सहा सामन्यांत १३५ धावा केल्या आणि लेग स्पिन गोलंदाजी करत १५ विकेट्स पटकावल्या. ती त्या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज ठरली.

सुझी बेट्स: न्यूझीलंडची ही उजव्या हाताची सलामीवीर तिच्या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. तिने १६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १३ शतके आणि ३४ अर्धशतकांसह ५७१८ धावा झळकावल्या आहेत.

 

हवामान

दुपारी जेव्हा सामना सुरु होईल तेव्हा सुमारे ३७ अंश सेल्सिअस तापमानासह हवामान उबदार असेल. संध्याकाळी वातावरण खेळण्यासाठी अधिक अनुकूल होईल कारण तेव्हा तापमान २७ अंश सेल्सिअसपर्यंत उतरेल. आर्द्रता २९% ते ३९% च्या श्रेणीत असेल.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ऑक्टोबर २४, २०२४

वेळ: दुपारी १:३० वाजता

स्थळ: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

प्रसारण: स्पोर्ट्स १८ नेटवर्क,जिओ सिनेमा ऍप