बेंच ताकदीची चाचणी करेल भारत, विजयाची आशा ऑस्ट्रेलियाला पाचव्या टी-20 मध्ये

Photo credits: PTI

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेवर आधीच शिक्कामोर्तब केल्यामुळे, भारताला त्यांच्या 17 सदस्यीय संघातील उर्वरित दोन खेळाडूं म्हणजेच वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांची चाचणी घेण्याची चांगली संधी आहे. ते दोघे पहिल्या चार सामन्यांसाठी बाकडा गरम करीत होते. परंतु जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या मालिकेचा शेवटचा सामना रविवारी बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळतील तेव्हा सुंदर आणि दुबे यांना संधी मिळू शकते.

चौथ्या टी-20 मध्ये, भारताने चार बदल केले आणि शेवटच्या सामन्यात ते किमान दोन बदल करतील अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला विजयासह मालिका संपन्न करून आनंदाने मायदेशी परतायचे असेल. त्यांचा कर्णधार मॅथ्यू वेडच्या सक्षम नेतृत्वाखाली त्यांनी या मालिकेत तगडी झुंज दिली.

 

संघ

भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार. 

ऑस्ट्रेलिया: मॅथ्यू वेड (कर्णधार), अॅरॉन हार्डी, जेसन बेहरेनडॉर्फ, शॉन अॅबॉट, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा.

 

चौथ्या टी-२० मध्ये काय झाले?

यशस्वी जैस्वाल (28 चेंडूत 37 धावा) आणि रुतुराज गायकवाड (28 चेंडूत 32 धावा) या सलामीवीरांनंतर रिंकू सिंगच्या 29 चेंडूत 46 धावा आणि जितेश शर्माच्या 19 चेंडूत 35 धावांच्या खेळीमुळे भारताने रायपूर येथे 20 षटकात 174 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली.  बेन द्वारशुईस हा आपला दुसरा आंतरराष्ट्रीय टी-20 खेळत असताना त्याने चार षटकांत ४० धावा देऊन तीन गडी बाद केले आणि तो ऑस्ट्रेलियासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. जेसन बेहरेनडॉर्फ आणि तनवीर संघाने उत्कृष्ट सहाय्यक भूमिका बजावली कारण त्यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाला ट्रॅव्हिस हेडने (16 चेंडूत 31 धावा) चांगली सुरुवात करून दिली पण ते नियमित अंतराने विकेट गमावत राहिले जे त्यांना महागात पडले. अक्षर पटेलने चार षटकांत फक्त 16 धावा लुटल्या आणि तीन विकेट्स पटकावल्या. त्याला रवी बिश्नोईची चांगली साथ लाभली ज्याने 17 धावा खर्च करून एक गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने 23 चेंडूत नाबाद 36 धावा ठोकून लढत दिली परंतु अखेरीस त्याच्या संघाला 20 धावा कमी पडल्या.

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे 

रिंकू सिंग: मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा भारताचा आक्रमक फलंदाज आहे. चौथ्या सामन्यात, त्याच्या 29 चेंडूत 46 धावांनी भारताला एक उत्कृष्ट डावाचा शेवट करता आला. तो शानदार फटकेबाजी करण्यासाठी जाणला जातो आणि तो कोणत्याही गोलंदाजाविरुद्ध मोठे शॉट्स लावण्याची क्षमता ठेवतो.

रवी बिश्नोई: भारताचा लेगस्पिनर चार सामन्यांत सात विकेट्स घेऊन या मालिकेतील आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने डावाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्याच्या विविधतेचा वापर करून उत्तम गोलंदाजी केली आहे. त्याची गुगली खेळणे फलंदाजांना खूप अवघड जाते.

ट्रॅव्हिस हेड: ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर त्याच्या संघाला दमदार सुरुवात करून देण्यासाठी ओळखला जातो. पॉवरप्लेमध्ये तो अशा प्रकारे फटकेबाजी करतो कि कोणत्याही विरोधी पक्षाचे मनोधैर्य खचू शकते. या मालिकेत त्याने दोन सामन्यांत जवळपास 200 च्या स्ट्राइक रेटने 66 धावा केल्या आहेत.

तन्वीर संघा: ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर एक चतुर गोलंदाज आहे. तो सातत्याने योग्य लाईन आणि लेन्थ वर टप्पा ठेवतो ज्यामुळे फलंदाजांना धावा करणे कठीण जाते. त्याच्या नावावर चार सामन्यात चार विकेट्स आहेत. गोलंदाजांसाठी धोकादायक मानल्या जाणाऱ्या चिन्नास्वामीवर तो कसा गोलंदाजी करतो हे पाहणे रंजक ठरेल.

 

खेळपट्टी आणि खेळण्याची परिस्थिती

बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या टी-20 सामन्याचे आयोजन होणार आहे. या मैदानावर खेळला जाणारा हा आठवा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना असेल. सात सामन्यांपैकी दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी पाच जिंकले. हे भारतातील सर्वात लहान मैदानांपैकी एक आहे. त्यामुळे येथील सामने अनेकदा उच्च स्कोअरिंगचे असतात. फलंदाजांना मदत करेल अशी खेळपट्टी सहसा इथे असते. मात्र ढगाळ वातावरणामुळे वेगवान गोलंदाजांना काही मदत होऊ शकते.

 

हवामान

हवामान अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. संध्याकाळी तापमान 21 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. पावसाची शक्यता 2% आहे. ढगांचे आवरण १००% असेल. उत्तर-पूर्वेकडून वारे वाहतील.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ३ डिसेंबर २०२३

वेळ: संध्याकाळी ७:००

स्थळ: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू

प्रसारण: स्पोर्ट्स १८, कलर्स सिनेप्लेक्स, जिओ सिनेमा ऍप

 

 

(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)