आत्मविश्वासाने भरलेला भारत दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढण्यासाठी तयार

Photo credits: PTI/Shahbaz Khan

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० मध्ये प्रशंसनीय कामगिरी केल्यानंतर, भारत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पाच सामन्यांच्या मालिकेतली दुसरी टी-२०, २६ नोव्हेंबर रोजी ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुवनंतपुरममध्ये खेळेल.

 

संघ

भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.

(श्रेयस अय्यर शेवटच्या दोन टी २० सामन्यांसाठी संघात सामील होईल आणि उपकर्णधाराची भूमिका स्वीकारेल)

 ऑस्ट्रेलिया: मॅथ्यू वेड (कर्णधार), अॅरॉन हार्डी, जेसन बेहरेनडॉर्फ, शॉन अॅबॉट, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा.

 

पहिल्या टी-२० मध्ये काय झाले?

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून, फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या परिस्थितीत, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाज २० षटकांत २०८ धावा देऊन बरेच महागडे ठरले. प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियासाठी, स्टीव्हन स्मिथ (५२) ने चांगली सुरुवात केली आणि नंतर त्याला जोश इंग्लिसने साथ दिली, ज्याने शानदार शतक ठोकले. २०९ ला लक्ष्य काही सोपा नव्हता परंतु भारताच्या टी-२० विशेषज्ञांनी एक चेंडू राखून लक्ष्य पूर्ण केले. इशान किशन (५८) आणि सूर्यकुमार यादव (८०) यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनानंतर, रिंकू सिंग (२२*), ज्याची एक फिनिशेर म्हणून ख्याती आहे, त्यानी भारताला शेवटच्या षटकात सामना जिंकवून दिला.

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

 सूर्यकुमार यादव: भारताच्या कर्णधाराने पहिल्या टी-२० मध्ये ४२ चेंडूत ८० धावांची रोमांचक खेळी केली. त्याने आपल्या मनोरंजक खेळीत नऊ चौकार आणि चार षटकार लगावले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला जेव्हा तो मैदानात आला तेव्हा त्याचा संघ २२/२ वर थोडा दडपणाखाली होता. त्याने खेळ सावरला आणि तिसर्‍या विकेटसाठी इशान किशनसोबत ११२ धावांची भागीदारी करून आपली कर्णधाराची भूमिका उत्तम निभावली.

मुकेश कुमार: बाकीच्या भारतीय गोलंदाजांकडून धावांचा प्रवाह जोरात वाहत असताना (अक्षर पटेल वगळता, ज्याने त्याच्या चार षटकांत ३२ धावा दिल्या), ३० वर्षीय उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने त्याच्या चार षटकांत २९ धावा दिल्या आणि तो सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. उच्च धावसंख्येच्या त्या सामन्यात त्याने जरी विकेट काढली नसली तरी त्याने त्याच्या शिस्तबद्ध गोलंदाजीने प्रभावीत केले.

जोश इंग्लिस: ऑस्ट्रेलियाच्या उजव्या हाताच्या फलंदाजाने (जो यष्टिरक्ष सुद्धा करू शकतो) भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० दरम्यान त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्याने ५० चेंडूत ११० धावा केल्या ज्यात ११ चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. संघाच्या एकूण २०८ धावांपैकी इंग्लिसने अर्ध्याहून अधिक धावा केल्या. भारताच्या वेगवान आणि फिरकीच्या विरोधात तो सहज खेळत होता.

तन्वीर संघा: ऑस्ट्रेलियाच्या या लेग स्पिनरने भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये बऱ्याच धावा दिल्या. परंतु तो त्याच्या संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज होता. त्याने चार षटकात ४७ धावा देऊन दोन विकेट्स पटकावल्या. इशान किशन आणि टिळक वर्मा यांना त्याने तंबूत पाठवले.

 

खेळपट्टी आणि खेळण्याची परिस्थिती

तिरुवनंतपुरममधील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्याचे आयोजन करेल. या ठिकाणी खेळला जाणारा हा चौथा टी-२० सामना असेल. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी येथे खेळल्या गेलेल्या तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. येथे सर्वाधिक धावसंख्या १७३ आहे. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असेल. धावांच्या मेजवानीचे अपेक्षा आहे.

 

हवामान

दुपारी पावसाची सर पडण्याची शक्यता आहे. हवामान बहुतांशी सूर्यप्रकाशित असेल. दिवसभरात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. पावसाची ५५% शक्यता आहे. ढगांचे आच्छादन २४% असेल. पश्चिम-वायव्येकडून वारे वाहतील.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: २६ नोव्हेंबर २०२३

वेळ: संध्याकाळी ७:००

स्थळ: ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुवनंतपुरम

प्रसारण: स्पोर्ट्स १८, कलर्स सिनेप्लेक्स, जिओ सिनेमा ऍप

 

 

(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)