भारतातून पहिल्यांदाच डाळिंबाची अमेरिका वारी

नवी मुंबई: अमेरिकेने भारतातील डाळिंबावर घातलेली बंदी आता उठवली आहे. त्यामुळे भारतातील डाळिंबाची अमेरिका वारी सुरू झाली आहे. कृषि पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन पहिली खेप २४ जानेवारीला रवाना झाली आहे.

सन २०१७-२०१८ मध्ये डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अमेरीकेने भारतातून डाळिंब आयात करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे गेली ५-६ वर्ष अमेरीकेस डाळिंब निर्यात होऊ शकली नाहीत. ही बंदी उठवणेबाबत अपेडा आणि एनपीपीओ भारत सरकार यांनी संयुक्तरीत्या अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा करून ही निर्यात बंदी उठवावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार सन २०२२ पासून अमेरीकेने घातलेली नियांत बंदी उठवली, मात्र त्यासाठी त्यांनी काही नियम व अटी घातल्या. त्यामध्ये माइंट वॉश, सोडीयम हायपोक्लोराईड प्रक्रिया, वॉशिंग-ड्राइंग इ. प्रक्रिया करुन त्यांनी निश्चित केलेल्या मानांकानुसारच्या बॉक्समध्ये पॅकिंग करुन डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करणे इत्यादी बाबीचा अंतर्भाव आहे. त्यानुसार अपेडा, भारत सरकार, एनपीपीओ, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, आणि के. बी. एक्सपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम व सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विकिरण सुविधा केंद्र या ठिकाणी अमेरीकन निरीक्षक यांचे उपस्थितीत डोझ मॅपिंग करुन सुविधा अद्ययावत करण्यात आली तसेच अमेरिकेस डाळिंब निर्यातीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार डाळिंबाची पहिली शिपमेंट २४ जानेवारी २०२४ रोजी कृषि पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन रवाना झाली.

प्रथम के. बी. एक्सपोर्ट यांचे पॅक हाऊस येथे डाळिंबाची प्रतवारी करुन त्यावर निश्चित केलेल्या प्रणालीनुसार प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सदर डाळिंब तीन किलोच्या बॉक्समध्ये भरुन त्यावर विकिरण सुविधा केंद्रात अमेरीकन इस्पेक्टर आणि एनपीपीओ यांच्या अधिका-यांचे तपासणी अंती व मान्यतेनंतर डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली. एकूण ३३६ बॉक्सेसमधून १३४४ किलो डाळिंब हवाईमार्गे पाठविण्यात आला आहे.

याप्रसंगी एनपीपीओ मुंबईचेचे असिस्टंट डायरेक्टर एन. के. मिना, अपेडा मुंबईचे सहाय्यक व्यवस्थापक पी.ए. बामने, निर्यातदार कोशल खक्कर, कृषि पणन मंडळाचे सहाय्यक सरव्यवस्थापक सतिश वाघमोडे, व्यवस्थापक डॉ. केदार तुपे तसेच एनपीपीओ, अपेडा आणि पणन मंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी या सर्वाच्या उपस्थितीत अमेरीकन निरीक्षक लुईस यांनी डाळिंबाचे कंटेनरला हिरवा झेंडा दाखवला. व्यावसायिक तत्त्वावर डाळिंबाचे ३३६ बॉक्स म्हणजे १३४४ किलो डाळिंब विमानाने अमेरिकेतील फ्लोरीडा या शहरात पाठविण्यात आले. या निर्यातीनंतर अमेरिकेतील मोठी बाजारपेठ खुली होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अमेरीकन मार्केटमध्ये भारतीय डाळिंबाचा बाजार हिस्सा वाढवण्यासाठी अपेडा, एनपीपीओ, कृषि पणन मंडळ आणि निर्यातदार यूएसडीए-एपीएचआयएस (USDA-APHIS) अधिका-यांसोबत काम करण्यासाठी अनेक पावले उचलत आहेत, भारतीय डाळिंबात कर्करोगापासून लढण्यासाठी लागणारे ॲन्टीऑक्सीडंट आहेत. अमेरीका येथील त्वचेच्या विकारांवरील उपचारासाठी असणा-या मार्गदर्शक डाइटमध्ये डाळिंबाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेत डाळिंबाला मोठी मागणी आहे, अमेरिकेतील कॅलिफोर्निया डाळिंबाच्या जातीपेक्षा भारतीय डाळिंबाच्या जातीला जास्त मागणी आहे. तसेच सद्यस्थितीत कॅलिफोर्निया येथील डाळिंबाचा हंगाम संपत आला असल्याने भारतीय डाळिंबांसाठी अमेरीका ही बाजारपेठ काबीज करण्यास वाव आहे. यामुळे डाळिंब उत्पादक शेतक-यांना फायदा होणार असून जास्तीत जास्त निर्यातदार व शेतकऱ्यांनी पणन मंडळाच्या वाशी नवी मुंबई येथील विकिरण सुविधेचा वापर करुन अमेरीकेला मोठ्या प्रमाणात डाळिंब निर्यात करणेसाठी कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी सर्व निर्यातदार व शेतकऱ्यांना आवाहन केले.