एकदिवसीय आणि कसोटी सामने जिंकल्यानंतर भारतीय महिला टी-२० मालिकेसाठी सज्ज  

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिन्ही एकदिवसीय सामने आणि एकुलती एक कसोटी जिंकल्यानंतर, भारतीय महिला तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यास सज्ज आहेत. ५,७ आणि ९ जुलै रोजी हे तीन टी-२० सामने पार पडतील.

 

आमने-सामने

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी-२० सामन्यांमध्ये भारताने नऊ तर दक्षिण आफ्रिकेने पाच जिंकले आहेत.

 

संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दयालन हेमलता, उमा चेत्री (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, सजना सजीवन, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, राधा यादव, अमनजोत कौर, आशा शोभना, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह ठाकूर, अरुंधती रेड्डी

दक्षिण आफ्रिका: लॉरा वूल्फार्ड (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नदिन डी क्लर्क, ॲनेरी डर्कसन, मिके डी रिडर, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), मारिझान काप, अयाबोंगा खाका, मसाबता क्लास, सुने लिस, एलिझ-मारी मार्क्स, नॉनकुलुलेको मलाबा, तुमी सेखुखुने, क्लोई ट्रायॉन

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

स्मृती मानधना: भारताची डावखुरी सलामीवीर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तिने आतापर्यंत या मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन एकदिवसीय शतके आणि एक कसोटी शतक नोंदवले आहे. तिच्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत, तिने १२९ डावात २८च्या सरासरीने आणि १२१च्या स्ट्राइक रेटने ३२२० धावा केल्या आहेत.

रेणुका सिंग ठाकूर: भारताच्या या उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाकडे पहिल्याच षटकात विकेट घेण्याची विलक्षण क्षमता आहे. तिच्या जबरदस्त इनस्विंगर्ससह, ती कुठल्याही फलंदाजाला त्रास देऊ शकते. या २८ वर्षीय खेळाडूने ४० टी-२० डावात ४३ विकेट्स घेतल्या आहेत. ती ६.५ पेक्षा कमी इकॉनॉमिने गोलंदाजी करते.

लॉरा वूल्फार्ड: भारताविरुद्ध चालू असलेल्या या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कर्णधार तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. उजव्या हाताची ही सलामीवीर ही एकमेव दक्षिण आफ्रिकेची खेळाडू आहे जिने तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे. ६० टी-२० डावांमध्ये तिने ३७च्या दमदार सरासरीने आणि ११४च्या स्ट्राइक रेटने १६०९ धावा केल्या आहेत.

नॉनकुलुलेको मलाबा: दक्षिण आफ्रिकेची ही डावखुरी फिरकीपटू डावाच्या कोणत्याही टप्प्यात गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवते. २०१९पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेली ही 24 वर्षीय खेळाडू, सर्व फॉर्मेटमधील संघाचा नियमित सदस्य असते. तिने ४७ टी-२० डावांमध्ये ३६ विकेट्स घेतल्या आहेत (सर्वोत्कृष्ट: ३/१०).

 

खेळपट्टी

चेन्नई येथे प्रथमच भारतीय महिला आणि दक्षिण आफ्रिका महिला एकमेकांविरुद्ध टी-२० सामना खेळतील. मात्र, दक्षिण आफ्रिकेला येथे खेळण्याचा अनुभव आहे. ते २०१६ टी-२० विश्वचषकादरम्यान आयर्लंडविरुद्ध खेळले आणि तो सामना ६७ धावांनी जिंकला. आतापर्यंत चेन्नईमध्ये महिलांचे चार टी-२० सामने खेळवले गेले आहेत (२०१६च्या टी-२० विश्वचषकादरम्यान सगळे सामने झाले). प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी सर्व जिंकले आहेत. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १३९ आहे. स्पर्धात्मक खेळपट्टीची अपेक्षा आहे जिथे फलंदाजांना आणि गोलंदाजांना दोघांनाही साहाय्य मिळू शकेल.

 

हवामान

हवामान ढगाळ (१००% ढगांचे आच्छादन) आणि गडगडाटी वादळांसह दमट (७८% आर्द्रता) असण्याची अपेक्षा आहे. सरासरी तापमान सुमारे २९ अंश सेल्सिअस असेल. पावसाची ७६% शक्यता आहे.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ५ जुलै, २०२४

वेळ: सायंकाळी ७:०० वाजता

स्थळ: एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

प्रसारण: जियो सिनेमा, स्पोर्ट्स १८