भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी विजयाची बोहनी करेल?

Photo credits: BCCI

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या ७.३ षटकात भारताच्या तीन विकेट्स घेतल्या आणि त्यांना ४०६ धावांवर बाद केले. महिलांच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही भारताची सर्वोच्च धावसंख्या होती. ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज अॅनाबेल सदरलँड आणि किम गार्थ यांनी शेवटच्या तीन विकेट्स घेऊन उत्तम कामगिरी केली. त्यांनी जलद गतीने गोलंदाजी केली आणि बॉऊन्सर्सचा देखील चांगला वापर केला. भारताचा डाव पहिल्या ४० मिनिटांत आटोपला असला तरी १८७ धावांच्या आघाडीमुळे ते तसे संतुष्ट होते.

पहिल्या डावाप्रमाणेच रेणुका सिंग ठाकूर आणि पूजा वस्त्राकर यांनी चेंडूने भारताची वाटचाल सुरू केली. मात्र, यावेळी बेथ मुनी आणि फीबी लिचफिल्ड या ऑस्ट्रेलियन सलामीच्या जोडीने भारतीय वेगवान गोलंदाजांविरुद्ध चांगला खेळ केला. पण जेव्हा भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने आक्रमणात फिरकी आणली, तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना थोडा त्रास झाला. अधूनमधून चेंडू थोडी कमी उसळी घेत असल्याने फलंदाजांना प्रामुख्याने फ्रन्ट फूटवर खेळण्यास भाग पाडले ज्याच्यामुळे त्यांच्या जवळ असलेले क्षेत्ररक्षक यांना झेल मिळायची शक्यता होती.

भारताला पहिले यश १२ व्या षटकात मिळाले जेव्हा त्यांनी मुनी (33) ला तंबूत पाठवले. सिली पॉईंटवर उभ्या असलेल्या रिचा घोषने मुनीला धावबाद केले. मुनीने घोषकडे चेंडू मारला आणि घोषने तो चेंडू फेकून स्टम्प्स उडवले.  मुनी क्रीसच्या बाहेर असल्यामुळे तिला धावबाद घोषित करण्यात आले. त्या विकेटमुळे भारताला मुनी आणि लिचफिल्ड यांच्यातील ४९ धावांची सलामीची भागीदारी तोडता आली. लगेचच भारताला दुसरे यश मिळाले. मुनी पाठोपाठ लिचफील्ड (१८) परतली. स्नेह राणाच्या गोलंदाजीवर लिचफिल्डने रिव्हर्स स्वीप करण्याच्या प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरल्या ती लेग बीफोर विकेट आऊट झाली. पहिल्या डावात डायमंड डकवर बाद झालेल्या या २० वर्षीय खेळाडूने कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने चांगला शॉट निवडला नाही आणि म्हणून तिची विकेट गेली.

त्यानंतर ताहलिया मॅकग्रा आणि एलिस पेरी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाचा डाव स्थिरावला. या सामन्यातील ऑस्ट्रेलियाची ही दुसरी ५०+ भागीदारी होती. विशेष म्हणजे मॅकग्रा या दोघांमध्ये सामील होती. जवळपास ३० षटकांसाठी मॅकग्रा आणि पेरी मैदानावर होते आणि अखेरीस भारताला त्यांची भागीदारी तोडण्यास यश मिळाले. राणाच्या गोलंदाजीवर पेरी (४५) बाद झाली. तिने लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला परंतु तिच्या बॅटचा हलका एज लागला आणि यष्टीरक्षक यस्तिका भाटियाने झेल घेतला.

पेरी बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिलीने मॅकग्रासोबत हातमिळवणी केली आणि या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. या प्रक्रियेत, मॅकग्राने सामन्यातील तिचे दुसरे अर्धशतक झळकावले आणि भारतातील महिलांच्या कसोटी सामन्यात दोन अर्धशतके झळकावणारी पहिली परदेशी खेळाडू बनली. भक्कम दिसत असलेल्या मॅकग्राची विकेट घेण्यासाठी भारताला चमत्काराची गरज होती. कर्णधार कौरने स्वतःला आक्रमणात आण्याचा निर्णय घेतला. तिने टाकलेल्या पहिल्याच षटकात मॅकग्राला बाद केले. कौरने मॅकग्राला फ्रन्ट फुटवर खेळण्यास भाग पाडले. मॅकग्राने (७३) चेंडू डिफेन्ड केला पण त्यानंतर चेंडू तिच्या पॅडला लागून स्टम्पवर लागला आणि ती क्लीन बोल्ड झाली. ऑस्ट्रेलिया एका नाजूक परिस्थितीत गेली कारण ते फक्त १९ धावांनी आघाडीवर होते आणि त्यांचे चार गडी बाद होते.

आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना, कौरने तिची दुसरी विकेट घेतली. स्वीप शॉर्ट खेळण्यासाठी चुकीचा चेंडू निवडणाऱ्या हिली (३२) ला तिने लेग बिफोर विकेट आऊट केले. ऑस्ट्रेलियाने फक्त ३४ धावांच्या आघाडीसह आपली अर्धी बाजू गमावली. पाहुण्यांनी दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या उरलेल्या काही षटकात अत्यंत संयमाने फलंदाजी केली. त्यांनी आणखी एकही विकेट गमावली नाही. अॅनाबेल सदरलँड (१२ नाबाद) आणि अॅशले गार्डनर (७ नाबाद) नाबाद राहिले आणि ऑस्ट्रेलियाला ४६ धावांची आघाडी मिळवून दिली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव कसोटी सामना अद्याप सामन्याच्या शेवटच्या दिवशी कोणत्याही निकालासह खुला आहे. भारताने नवीन चेंडू तिसऱ्या दिवसाच्या खेळीच्या अखेरचे नऊ चेंडू शिल्लक असताना घेतला. त्यामुळे ठाकूर आणि वस्त्राकर जेव्हा चौथ्या दिवसाची खेळी सुरु करतील (असे अपेक्षित आहे) तेव्हा त्यांनी नवीन चेंडूचा चांगला उपयोग करून ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट करायचा प्रयत्न करावा. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला कमीत कमी चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात फलंदाजी करावी लागेल आणि कसोटी जिंकण्यासाठी किंवा अनिर्णित ठेवण्यासाठी आणखी १३०-१५० धावांची भर घालायवी लागेल.

भारत ऑस्ट्रेलियाला रोखून त्यांच्याविरुद्धचा पहिला कसोटी विजय मिळवू शकतो का? सामन्याचा चौथा दिवस ठरवेल.