भारताचे गोलंदाज चमकले, ऑस्ट्रेलियाचे फलंदाज लडखडले                     

Photo credits: BCCI

३९ वर्षांनंतर महिलांचे कसोटी क्रिकेट मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर परतले जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकींविरुद्ध गुरुवारी भिडले. ऑस्ट्रेलियाची कर्णधार अ‍ॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, पाहुण्यांना मिळालेल्या संधीचा त्यांना सदुपयोग करता आला नाही कारण ते ७७.४ षटकांत २१९ धावांत गुंडाळले गेले. महिलांच्या कसोटी सामन्यांमध्ये भारताविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियासाठी हि सर्वात कमी धावसंख्या होती (सगळे गडी बाद).

सामन्याच्या पहिल्याच षटकात त्यांची सलामीची फलंदाज फीबी लिचफिल्ड (0) गमावल्याने ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करता आली नाही. बॅकवर्ड पॉईंटवर उभ्या असलेल्या जेमिमाह रॉड्रिग्सच्या उजवीकडे शॉट मारत लिचफिएल्डची सलामीची जोडीदार बेथ मुनी एक धाव घेण्यासाठी सुटली परंतु रॉड्रिग्सने चेंडू नीट गोळा केला आणि यष्टीरक्षक यस्तिका भाटियाकडे फेकला. स्टम्प्स उडवण्याचे काम करून भाटियाने भारताला पहिले यश मिळवून दिले. भारतीयांनी दुसरी विकेट घेण्यासाठी जास्त वेळ वाया घालवला नाही कारण दुसऱ्या षटकात पूजा वस्त्राकरने एलिस पेरी (4) या ऑस्ट्रेलियन संघातील सर्वात अनुभवी कसोटी क्रिकेटपटूला क्लीन बोल्ड केले.

एकापाठोपाठ दोन गडी गमावल्यानंतर, मुनी आणि ताहलिया मॅकग्रा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. रेणुका सिंग ठाकूरच्या गोलंदाजीवर दुसऱ्या स्लिपवर उभ्या असलेल्या दीप्ती शर्माने मॅकग्राचा एक अवघड झेल सोडला. मॅकग्रा तेव्हा १८ धावांवर होती. भारताला तो कॅच सोडणे महागात पडले कारण मॅकग्रा ने तिसरे कसोटी अर्धशतक झळकावले. ५० धावा पूर्ण केल्या केल्या तिची विकेट स्नेह राणानी काढली. मॅकग्राच्या जागेवर फलंदाजी करायलाया आली कर्णधार अॅलिसा हिली. ऑस्ट्रेलियन्सना मुनी आणि हिलीने डाव पुढे नेण्याची इच्छा होती पण मुनीला (४०) पॅव्हेलियनमध्ये परत करण्यात वस्त्राकर यशस्वी ठरली. त्याचबरोबर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असलेल्या हीलीला (३८) शर्माने तंबूत पाठवले. शेवटी, किम गार्थने २८ धावांवर नाबाद राहून तिच्या संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली.

या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर भारी पडले. भारतासाठी वस्त्राकर ही सर्वात यशस्वी गोलंदाज होती. तिने चांगल्या गतीने आणि नियंत्रणाने गोलंदाजी केली. तिने ५३ धावा देऊन चार विकेट्स पटकावल्या. तिच्या साथीदाराने म्हणजेच ऑफ स्पिनर्स शर्मा आणि राणा यांनी प्रतिकेच्या दोन आणि तीन गडी बाद तिला करून छान साथ दिली.

गोलंदाजांच्या पराक्रमी कामगिरीनंतर भारतीय फलंदाजांना आपले काम करण्याची वेळ आली. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा (४०) या सलामीच्या जोडीने अवघ्या १०० चेंडूत ९० धावांची भागीदारी रचून झटपट सुरुवात केली. मानधनाचे नशीब बरेच चांगले होते. फलंदाजी करताना दोन वेळा तिच्या बॅटला चेंडू लागून स्टम्प्सच्या अगदी जवळून जाताना चौकारांसाठी गेला. इतर कोणत्याही दिवशी एखादवेळी तिची दांडी गुल झाली असती. परंतु गुरुवारच्या तिच्या खेळीत ती नशीबवान होती. अन्यथा ती भक्कम दिसत होती.

दिवसाची खेळी संपायला केवळ तीन षटके शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाने भारताला पहिला झटका दिला. जेस जोनासेनने स्पेलचे पहिले षटक टाकत वर्माच्या (४०) डिफेन्सच्या आरपार जात तिचा लेग बिफोर विकेट मिळवला. दिवसाच्या शेवटच्या १४ चेंडूंसाठी मानधनाला साथ देण्यासाठी राणा आली. आल्या आल्या तिने क्लासिक कव्हर ड्राईव्हसह आपले खाते उघडले. अखेरीस दिवसाचा खेळ संपला तेव्हा राणा ४ धावांवर आणि मानधना ४३ धावांवर नाबाद राहिल्या. भारताने एकूण ९८ धावा केल्या. शुक्रवारचा खेळ भारत १२१ धावांनी पिछाडीवर असताना सुरु करतील.