आशिया कपमध्ये झालेल्या पराभवाचा बदला भारत श्रीलंकेविरुद्ध घेणार?

यंदाच्या आशिया चषकाच्या अंतिम फेरीत खेळलेले दोन संघ, भारत आणि श्रीलंका पुन्हा एकदा भेटणार. आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या १२ व्या सामन्यात दुबईत बुधवारी हे दोन आशियाई संघ आमने सामने येतील. दोन्ही संघांना या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याची शक्यता बळकट करण्यासाठी विजय आवश्यक आहे. भारताने दोन सामन्यांत एक विजय नोंदवला आहे, तर दुसरीकडे श्रीलंका त्यांचे दोन्ही सामने गमावून मात्र पहिल्या विजयाच्या शोधात आहे. भारतासाठी त्यांची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात मानेला दुखापत झालेली. म्हणून श्रीलंकेविरुद्ध तिची उपलब्धता अजून निश्चित नाही.

आमने-सामने

भारत आणि श्रीलंका एकमेकांविरुद्ध २५ आंतराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत, ज्यापैकी भारताने १९ आणि श्रीलंकेने पाच जिंकले आहेत. टी-२० विश्वचषकात भारत आणि श्रीलंका पाच वेळा आमनेसामने आले आहेत आणि भारताने ४-१ अशा फरकाने वर्चस्व राखले आहे.

संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजीवन सजना

श्रीलंका: चमारी अथापथु (कर्णधार), अनुष्का संजीवनी, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षिका सिल्वा, इनोका रणवीरा, हसिनी परेरा, कविशा दिलहरी, सचिनी निसानसाला, विश्मी गुणरत्ने, उदेशिका प्रबोधनी, अचिनी कुलसूरिया, सुगंदिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, शशिनी गिम्हानी, अमा कांचना

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

शफाली वर्मा: भारताच्या या उजव्या हाताच्या सलामीच्या फलंदाजाने मागील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ३५ चेंडूत ३२ धावा केल्या होत्या. ती भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती. तिने या खेळीत तीन चौकार मारले.

अरुंधती रेड्डी: भारताच्या या उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने पाकिस्तानविरुद्धच्या मागील सामन्यात चमकदार कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार जिंकला. तिने चार षटकात १९ धावा दिल्या आणि तीन विकेट्स पटकावल्या.

निलाक्षी सिल्वा: श्रीलंकेची ही उजव्या हाताची मधल्या फळीतील फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील सामन्यात तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. तिने ४० चेंडूत नाबाद २९ धावा केल्या.

चमारी अथापथु: श्रीलंकेच्या कर्णधाराने आतापर्यंत या विश्वचषकात मोठी धावसंख्या केलेली नाही. या डावखुऱ्या सलामीच्या फलंदाजाकडून खूप अपेक्षा असतील.  फलंदाजीबरोबरच ती ऑफ स्पिन गोलंदाज म्हणून सुद्धा योगदान देऊ शकते.

हवामान

जवळपास ३१ अंश सेल्सिअस तापमानासह, हवामान अधिक उबदार राहण्याची अपेक्षा करा. आर्द्रता ५७% च्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ९ ऑक्टोबर २०२४

वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता

स्थळ: दुबई आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार