दक्षिण आफ्रिकेच्या महिलांची नजर भारताविरुद्ध टी-२० मालिका जिंकण्याकडे

दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाने तब्बल तीन आठवड्यांनंतर अखेर यशाची चव चाखली. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आणि एक कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेने १२ धावांनी विजय मिळवून टी-२० मालिकेची सुरुवात केली. या मालिकेत आणखी दोन टी-२० सामने शिल्लक आहेत. पाहुण्यांनी जर दुसरी टी-२० जिंकली तर मालिका त्यांच्या नावावर होईल. भारतीय महिला आणि दक्षिण आफ्रिका महिला यांच्यातील दुसरा टी-२० सामना ७ जुलै रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल.

 

आमने-सामने

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी-२० सामन्यांमध्ये भारताने नऊ तर दक्षिण आफ्रिकेने सहा जिंकले आहेत.

 

संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दयालन हेमलता, उमा चेत्री (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, सजना सजीवन, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, राधा यादव, अमनजोत कौर, आशा शोभना, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह ठाकूर, अरुंधती रेड्डी

दक्षिण आफ्रिका: लॉरा वूल्फार्ड (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नदिन डी क्लर्क, ॲनेरी डर्कसन, मिके डी रिडर, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), मारिझान काप, अयाबोंगा खाका, मसाबता क्लास, सुने लिस, एलिझ-मारी मार्क्स, नॉनकुलुलेको मलाबा, तुमी सेखुखुने, क्लोई ट्रायॉन

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

जेमिमाह रॉड्रिग्स: भारताच्या या मधल्या फळीतील फलंदाजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये तिचे ११वे टी-२० अर्धशतक ठोकले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिने ३० चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५३ धावा केल्या. तिने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत ९० धावांची भागीदारीही केली.

पूजा वस्त्राकर: ही उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारतासाठी संयुक्त-सर्वाधिक यशस्वी गोलंदाज होती. तिने चार षटकांत २३ धावा देऊन दोन विकेट्स काढल्या. तिच्या गोलंदाजीसोबतच ती फलंदाजम्हणूनसुद्धा खालच्या क्रमवारीत योगदान करू शकते.

तझमिन ब्रिट्स: दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीराने भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये ५६ चेंडूत केलेल्या ८१ धावांच्या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार जिंकला. या उजव्या हाताच्या फलंदाजाने तिच्या संघाला २० षटकांत १८९ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली. तिने कर्णधार लॉरा वूल्फार्डसोबत ५० धावांची तर मारिझान कापसोबत ९६ धावांची भागिदारी केली .

क्लोई ट्रायॉन: दक्षिण आफ्रिकेच्या या अष्टपैलू खेळाडूने भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये बॅट आणि चेंडूने योगदान दिले. बॅटने, तिने एका षटकारासह आठ चेंडूत १२ धावा केल्या आणि डावखुरी फिरकी गोलंदाजी करत तिने भारताची शानदार सलामीवीर स्मृती मानधनाची मोठी विकेट घेतली.

खेळपट्टी

शुक्रवारी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२०मध्ये ३५०हून अधिक धावा झाल्या होत्या. आणखी एका उच्च स्कोअरिंग स्पर्धेची अपेक्षा करा कारण खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल परिस्थिती देऊ शकते.

 

हवामान

हवामान ढगाळ (१००% ढगांचे आच्छादन) असण्याची अपेक्षा आहे. काही भागात गडगडाटीचे वातावरण असू शकते. सरासरी तापमान सुमारे २७ अंश सेल्सिअस असेल. पावसाची ६६% शक्यता आहे.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ७ जुलै, २०२४

वेळ: सायंकाळी ७:०० वाजता

स्थळ: एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

प्रसारण: जियो सिनेमा, स्पोर्ट्स १८