महिला आशिया चषकात आज येणार भारत आणि पाकिस्तान समोरासमोर

महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात, कट्टर प्रतिस्पर्धी, भारत आणि पाकिस्तान हे शुक्रवारी रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एकमेकांविरुद्ध भिडतील. अलिकडच्या काळात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला भारत, जो गतविजेता देखील आहे, आपल्या मोहिमेची सुरुवात सकारात्मक दिशेने करण्यास उत्सुक असेल.

 

आमने-सामने

टी-२० क्रिकेटमध्ये भारताने १४ पैकी ११ सामने जिंकून पाकिस्तानवर वर्चस्व राखले आहे.

 

संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा चेत्री (यष्टीरक्षक), स्मृती मानधना (उप कर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, रेणुका ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन

पाकिस्तान: निदा डर (कर्णधार), इरम जावेद, सादिया इक्बाल, आलिया रियाझ, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोजा (यष्टीरक्षक), मुनीबा अली (यष्टीरक्षक), सिद्रा अमीन, नजिहा अल्वी (यष्टीरक्षक), सय्यदा अरूब शाह, नशरा सुंधू, तस्मिया रुबाब, ओमायमा सोहेल, तुबा हसन

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

स्मृती मानधना: भारताची उपकर्णधार जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिका मालिकेत या डावखुऱ्या सलामीच्या फलंदाजाने सहा डावांमध्ये (३ एकदिवसीय डाव, १ कसोटी डाव, २ टी-२० डाव) ५९२ धावा केल्या. एकूण १३६ आंतराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये या अनुभवी खेळाडूने १२२च्या स्ट्राइक रेटने ३३२० धावा केल्या आहेत.

पूजा वस्त्राकर: भारताच्या या उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. तिने एकूण आठ विकेट्स काढल्या ज्यात एका चार विकेट हॉलचा समावेश होता. गोलंदाजीसोबतच ती खालच्या क्रमवारीत एक आक्रमक फलंदाज म्हणून भूमिका बजावते.

सिद्रा अमीन: पाकिस्तानची ही उजव्या हाताची सलामीवीर २०११पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. ५१ टी-२० डावात तिने ८९३ धावा केल्या आहेत, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. तिची अलीकडील कामगिरी  चांगली आहे. गेल्या नऊ टी-२० सामन्यांमध्ये तिने २४८ धावा केल्या आहेत.

निदा डर: १४९ टी-२० सामने खेळलेली पाकिस्तानची कर्णधार संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. उजव्या हाताची मधल्या फळीतील फलंदाज आणि ऑफ-स्पिनर म्हणून ओळखली जाणारी ही खेळाडू जगातील सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक आहे. आंतराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये तिच्या नावावर १४० विकेट्स आणि १९३३ धावा आहेत.

 

 

खेळपट्टी

या मैदानावर दिवसाचा हा दुसरा सामना असेल. या स्पर्धेपूर्वी, या ठिकाणी महिलांचे तीन आंतराष्ट्रीय टी-२० सामने आयोजित केले गेले होते आणि ते सर्व २०२२मध्ये खेळले गेले होते. धावांचा पाठलाग करताना संघांनी तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. येथे सर्वाधिक धावसंख्या १४१ आहे तर सर्वात कमी १०४ आहे. या स्पर्धेसाठी ताजी खेळपट्टी वापरणे अपेक्षित असल्याने फलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल असू शकते.

 

हवामान

हवामान ढगाळ (१००% ढगांचे आच्छादन) आणि हवेशीर असेल. परिसरात काही ठिकाणी गडगडाट होऊ शकतो. पावसाची ४०% शक्यता आहे. तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: १९ जुलै, २०२४

वेळ: सायंकाळी ७:०० वाजता

स्थळ: रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, डंबुला

प्रसारण: डिस्नी + हॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स