काय भारत न्यूझीलंडविरुद्ध “क्लीन स्वीप” टाळू शकेल?

तब्बल १२ वर्षांनंतर भारताला त्यांच्याच घरी कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला. सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंडने दणदणीत विजयांची नोंद केली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी आणि अंतिम कसोटी शुक्रवारपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या शेवटच्या कसोटीत भारत त्यांचा अभिमान जपण्याचा प्रयत्न करेल, तर न्यूझीलंड “क्लीन स्वीप” करण्यास उत्सुक असेल.  जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप) अंतिम सामना कोणते दोन संघ खेळतील अजून निश्चित नाही. म्हणूनच या मालिकेतील अखेरची कसोटी जो जिंकेल त्याची ती फायनल खेळण्याची शक्यता वाढेल.

 

आमने सामने

भारत आणि न्यूझीलंड यांनी एकमेकांविरुद्ध ६४ कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने २२ आणि न्यूझीलंडने १५ जिंकले आहेत. भारतात खेळल्या गेलेल्या ३८ पैकी चार कसोटी सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत, त्यापैकी दोन विजय या सुरु असलेल्या मालिकेत मिळाले आहेत.

 

संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा

न्यूझीलंड: टॉम लेथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, विल यंग, ​​मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, मॅट हेन्री, विल्यम ओ’रूरके, एजाज पटेल, ईश सोधी, टीम साऊदी

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

वॉशिंग्टन सुंदर: भारताच्या या उजव्या हाताच्या ऑफस्पिनरने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत चमकदार कामगिरी केली. पहिल्या कसोटीसाठी तो संघाचा भाग नव्हता. नंतर त्याच्या चांगल्या डोमेस्टिक फॉर्मच्या जोरावर      त्याला दुसऱ्या कसोटीसाठी संघात सामील करण्यात आले आणि त्याने प्रभावित केले. त्याने दोन डावात ११ विकेट्स घेत आपली छाप पाडली.

यशस्वी जैस्वाल: भारताचा हा डावखुरा सलामीवीर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत त्याच्या होम ग्राऊंडवर शानदार प्रदर्शन करण्याचे ध्येय ठेवेल. त्याने या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत १५५ धावा केल्या असून त्यात  सर्वोत्तम ७७ धावांच्या खेळीचा समावेश आहे.

रचिन रवींद्र: न्यूझीलंडच्या या डावखुऱ्या मधल्या फळीतील फलंदाजाने या कसोटी मालिकेत आतापर्यंत चार डावात २४७ धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि अर्धशतक झळकावले आहे. त्याच्या फलंदाजीव्यतिरिक्त, तो एक डावखुरा फिरकीपटू म्हणून योगदान देऊ शकतो.

मिचेल सँटनर: न्यूझीलंडच्या या डावखुऱ्या फिरकीपटूने दुसऱ्या कसोटीत भारताच्या फलंदाजीची कंबर मोडली.      या मालिकेतील पहिला सामना खेळताना त्याने दोन डावात एकूण १३ विकेट्स पटकावल्या. त्याने त्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कारही जिंकला. तसेच खालच्या क्रमवारीत फलंदाजी करत त्याने उपयुक्त ३३ धावा केल्या.

हवामान

सरासरी ३६ अंश सेल्सिअस तापमानासह हवामान गरम असेल. दुपारनंतर गडगडाटी वादळे येऊ शकतात.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: नोव्हेंबर १ – ५, २०२४

वेळ: सकाळी ९:३० वाजता

स्थळ: वानखेडे स्टेडियम, मुंबई

प्रसारण: स्पोर्ट्स १८ नेटवर्क, जिओ सिनेमा ॲप