मतदान केंद्रे वाढवली; मतदारक्षमता घटवली !

ठाणे जिल्ह्यातील ७१,५५,७२८ मतदार करणार विनासायास मतदान

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या यंदा ३५०ने वाढवली असून केंद्रनिहाय मतदारांची संख्याही कमी केली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ७१ लाख ५५,७२८ मतदारांना मागील निवडणुकीप्रमाणे यंदा कोणताही मनस्ताप होणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत जिल्हा निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी काय उपाययोजना करणार आहेत, याची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मतदान केंद्राची संख्या ६५५३ वरून ६,८९४ इतकी केली असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीत एका मतदान केंद्रावर किमान १६०० मतदारांची नावे होती, ती संख्या बाराशे इतकी करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मतदारांना उन्हाचा त्रास झाला होता तसेच बसण्याची सोय नव्हती, परंतु यावेळी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघ असून ७१ लाख ५५,७२८ मतदार आहेत. त्यामध्ये ३८ लाख १३,२६४ पुरुष तर ३३ लाख ४१,०७० स्त्री मतदार आहेत. नवीन मतदारांची संख्या १६ लाख ५५९७ इतकी असून दिव्यांग मतदार ३७,८५४ इतके आहेत. ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या ५७,२०९ एवढी असल्याचे श्री. शिनगारे म्हणाले.

सर्वाधिक मतदार ओवळा-माजिवडा मतदारसंघात असून त्याची संख्या पाच लाख ४०,२९३ इतकी आहे तर सर्वाधिक कमी मतदार दोन लाख ८०,८५२ उल्हासनगर येथे आहेत. या निवडणुकीकरिता ६,८९४ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्याकरिता ३५ हजार कर्मचारी लागणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले.