ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनची अभिनव स्पर्धा
ठाणे: ठाण्यातील गृहनिर्माण सोसायट्यांनी १०० टक्के मतदान व्हावे, या अपेक्षेने, फेडरेशनने “मतटक्का वाढवा आणि पुरस्कार मिळवा” अशी अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली.
या उपक्रमात ८० टक्के आणि त्यापेक्षा जास्त मतदान करणाऱ्या सोसायट्यांना ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याहस्ते गौरविण्यात येणार आहे.
लोकशाहीचा मोठा उत्सव असलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. तेव्हा, या विधानसभा निवडणूकीत ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने कंबर कसली आहे. त्यानुसार, निवडणुकीत किमान ८० टक्के मतदान करणाऱ्या ठाणे जिल्हयातील गृहनिर्माण सोसायटयांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ज्या गृहनिर्माण सोसायटीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल, त्या सोसायटयांनी निर्धारीत मतदान केल्याच्या विहित पुराव्यासह ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या शिवाजी पथ येथील कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन सीताराम राणे यांनी केले आहे.