ठाणेकर आणि मुंबईकर गेल्या काही वर्षांपासून ठाणे आणि मुंबईला जोडणा-या नव्या-को-या कोपरी पुलाची आतूरतेने वाट पाहात असताना, येत्या शुक्रवारी, १० फेब्रुवारी रोजी या नव्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या पुलाचे रुंदीकरण आणि महत्वाची डागडुजी संपल्यानंतरही कोपरी पुलाच्या चार मार्गिका केव्हा खुल्या होणार याची वाट मुख्यत्वे ठाणेकर आणि वाहन चालक पाहात आहेत. या मार्गिका जानेवारी २०२३ रोजी खुल्या होणार असल्याची अनौपचारिक माहिती प्राधिकरणाच्या अधिका-यांनी पत्रकारांनी दिली होती. परंतु, फेब्रुवारी सुरु होऊनही हा पूल अधिकृतरित्या वाहनांसाठी केव्हा खुला होणार याचे औत्सुक्य चालकांना लागले आहे.
मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस ९ फेब्रुवारी रोजी आहे. त्यादिवशी या मार्गिका खुल्या करण्याचे नियोजन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिका-यांनी केले होते. मात्र ते काही कारणास्तव दुस-या दिवशी होणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली. या पार्श्वभूमीवर पुलाच्या मधोमध फुलझाडांची रोपे लावण्यात आली असून, ठाणेहून मुंबईकडे जाणारा महामार्ग धुवूनही काढण्यात आला.