दोन आठवड्यात महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार?

मुंबई : सत्यजित तांबे प्रकरणावरून काँग्रेसमध्ये सुरू झालेला अंतर्गत कलह वाढताना पाहायला मिळत आहे. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा पाठवल्यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरू झाल्या आहेत. बाळासाहेब थोरात आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत तर दुसरीकडे नाना पटोले यांच्या तक्रारींमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे.. पुढील पंधरा दिवसात महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत कलह कमी होण्याऐवजी वाढताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा हाय कमांडकडे पाठवल्यानंतर ते या राजीनाम्यावर ठाम आहेत. तर त्यांची मनधरणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राज्यातील नेते प्रयत्न करत आहेत. केंद्रातीलही काही नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची सुत्रांची माहिती आहे.

बाळासाहेब थोरात यांची समजूत काढण्याबरोबरच बाळासाहेब थोरात यांच्यावर अन्याय कसा झाला आणि नाना पटोले कसे चुकीचे आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसचे काही नेते वारंवार करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात राज्यात काँग्रेसची एक फळी निर्माण होताना पाहायला मिळत आहे.

नाना पटोले आणि थोरात प्रकरणानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांची दिल्लीवारी सुरू झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीत जाऊन ठाण मांडले आहे. थोरात यांच्या गटनेतेपदाचा राजीनामा मंजूर झाला तर अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल स्व पक्षातील काँग्रेस नेत्यांची काही प्रमाणात नाराजी तर आहेच मात्र महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचीही नाराजी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी उघडपणे अनेकदा नाराजी व्यक्त केलेली होती. त्याचसोबत शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधूनही वारंवार नाना पटोले आणि कांग्रेसवर टीका होताना पाहायला मिळत आहे.

या सर्व घडामोडी घडत असताना महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी वाढलेली पाहायला मिळते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या जवळच्या नेत्याशी संपर्क करुन आपला रस्ता सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.