एअर रायफल शुटींग ठाणेकरांच्या सेवेत

एअर रायफल शूटिंग या खेळाचा उगम धनुर्विद्येपासून झाला असे सांगण्यात येते. आधुनिक काळामध्ये धनुर्विद्येची जागा ही रायफल आणि पिस्तुलने घेतली आहे. या खेळामध्ये एका ठराविक अंतरावर लक्ष्य ठेवण्यात येते आणि त्याचा अचूक नेम साधावा लागतो.
साधारण 15-16 व्या शतकामध्ये युरोप देशात या खेळाची सुरूवात झाल्याचे समजते. तर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नेमबाजी या खेळाचा समावेश 1896 मध्ये झाला.
एअर रायफल शूटिंग उभे राहून, बसून आणि झोपून या तिन्ही शारीरिक स्थितीत करता येते. यात प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. शुटींगसाठी वापरण्यात येणारी बंदूक, शूटरची असणारी स्थिती आणि अंतर यावरून हे प्रकार आहेत.
अनेकांना बंदुकीचे आकर्षण असते. त्यामुळे एअर रायफल शूटिंग शिकण्यास प्राध्यान्य देतात. हा खेळ तेवढासा लोकप्रिय व परिचित नाही तरीही ठाणेकरांचा एअर रायफल शूटिंग या क्रीडा प्रकाराला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
======================================

१० x शुटिंग इंडिया – पोखरण रोड १ येथील १० x शुटिंग इंडिया ही ठाण्यातील प्रसिद्ध रायफल शुटींग अकॅडमी आहे. २०१९ साली ही अकॅडमी सुरु झाली असून येथे सध्या ७०-८० मुले रायफल शुटिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. १० वर्षावरील मुलांना येथे प्रशिक्षण घेता येते. लवकरच ही शुटीग रेंज आंतरराष्ट्रीय स्तरावरील शुटिंग रेंज होणार आहे. येथील जवळपास १२ ते १३ शूटर्सनी डी एस ओ, जिल्हस्तरीय, राष्ट्रस्तरीय शुटिंग स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली आहेत. ठाणेकरांचा उत्तम प्रतिसाद या अकॅडमीला मिळत आहे.

अभिजित पुरव – लहान असल्यापसून मला रायफल शुटिंगची आवड आहे. मी स्वतः नॅशनल गोल्ड मेडलिस्ट शूटर असून २०१९ साली मी स्वखर्चाने माझी रेंज सुरु केली. एअर रायफल शुटींग हा खूप छान व वेगळा असा क्रीडाप्रकार आहे. ठाणेकरांचा ओढा रायफल शूटिंग शिकण्याकडे वाढत आहे. परंतु अजुनही रायफल शुटींग बद्दल तेवढी जागरूकता पाहायला मिळत नाही याबद्दल खंत वाटते. मी माझ्यापरीने ही जागरूकता वाढावी यासाठी प्रयत्न करत असतो.
(प्रशिक्षक – १० x शूटिंग अकॅडमी)

विनीत झांजे- मी गेली तीन वर्षे १०x शूटिंग अकॅडमी येथे रायफल शूटिंग शिकत आहे. मी आधी क्रिकेट खेळायचो परंतु कोव्हीड काळात मला रायफल शूटिंग या खेळाबद्दल उत्सुकता वाटू लागली व मी शिकण्यास सुरुवात केली. गुजरात, दिल्ली, भोपाळ अशा विविध ठिकाणी जाऊन मी रायफल शूटिंगच्या स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवलेली आहेत. तसेच वेस्ट झोन 10 मीटर एअर पिस्टल चॅम्पियनशिपच्या ओपन कॅटेगरी मध्ये रौप्यपदक मिळवले आहे.
(कर्णबधिर शूटर -१० x रायफल अकादमी) =======================================प्रिसिहोल स्पोर्ट्स फाउंडेशन – प्रिसिहोल स्पोर्ट्स फाउंडेशन ही ठाण्यातली वागळे इस्टेट येथे असलेली अद्ययावत व आंतरराष्ट्रीय पातळीची शुटिंग रेंज आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला रायफल शुटिंगसाठी लागणारे सर्वांगीण प्रशिक्षण दिले जाते. ज्यात क्रीडा मानसशास्त्र प्रशिक्षण, क्रीडा पोषण, सामर्थ्य आणि कंडिशनिंग प्रशिक्षण, क्रीडा विशिष्ट फिटनेस, क्रीडापटूंच्या गरजा समजून घेण्यासाठी वेगवेगळे मूल्यांकन आणि त्यांचे कार्यप्रदर्शन आणि अनुभव सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि ऑलिम्पियनसह काम करणारे तांत्रिक तज्ज्ञ यांचा समावेश आहे. तसेच येथील शूटरच्या प्रत्येक स्तरासाठी क्रीडा विशिष्ट तांत्रिक मूल्यांकन केले जाते. सध्या येथे 15- 20 मुले रायफल शूटिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. यातील काही मुले एअर रायफल शुटिंगच्या जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच देशस्तरीय पातळीवरील चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेली आहेत. येथील प्रशिक्षक स्वतः एअर रायफल शुटिंग चॅम्पियन असून 25 अधिक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे .

अनाया भालेराव – मी नववीमध्ये शिकत आहे. गेली अडीच वर्ष मी एअर रायफल शुटिंग शिकत आहे. मी एअर रायफल शुटिंगच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. नुकत्याच झालेल्या एअर रायफल शुटिंगच्या राष्ट्रीय स्तरावरील ट्रायल्समध्ये मी सहभाग घेतला होता. यामुळे माझी एकाग्रता वाढली, याचा फायदा मला अभ्यास करतानाही होतो. माझ्या पालकांचा मला यासाठी उत्तम पाठिंबा मिळत आहे.
(शूटर – प्रीसिहोल फाउंडेशन ट्रेनिंग सेंटर)

आहना पळणिटकर – मी दोन वर्ष एअर रायफल शुटिंगचे प्रशिक्षण घेत आहे. मला राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये मेडल्स मिळालेली आहेत. तसेच मी सध्या राष्ट्रीय पातळीवरील एअर रायफल शुटिंग स्पर्धेसाठी तयारी करत आहे. मी आतापर्यंत खेळलेल्या प्रत्येक मॅचमधून मला काही ना काही नवे शिकायला मिळाले आहे. यामुळे मला अभ्यासासोबत इतर गोष्टी करतानाही लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. मला रायफलमुळे प्रेरणा मिळते.
(शूटर – प्रिसीहोल फाउंडेशन ट्रेनिंग सेंटर )

जितेश कदम – मी गेली 25 – 26 वर्ष एअर रायफल शुटिंग करत आहे. सध्या मी ठाण्यातील प्रिसिहोल फाउंडेशन ट्रेनिंग सेंटर येथे एअर रायफल शुटिंगचे प्रशिक्षण देतो. या खेळामुळे सर्वांगिण विकास व्हायला मदत होते. तसेच एअर रायफल शुटिंगमुळे एकाग्रता वाढते. एअर रायफल शुटिंगची खरोखर आवड असल्यास त्यामध्ये तुमचे करिअरही उत्तम घडू शकते. एअर रायफल शुटिंगचे प्राथमिक शिक्षण प्रत्येकाने घेतले पाहिजे. ठाणेकरांची एअर रायफल शुटिंग प्रति असलेली उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.
(प्रशिक्षक- प्रिसिहोल फाउंडेशन ट्रेनिंग सेंटर)