पदवीधर मतदारसंघात महायुतीचा होणार महाआघाडीशी सामना

भाजपचे डावखरे विरुद्ध काँग्रेसचे किर रिंगणात

ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने काँग्रेस पक्षाचे रमेश किर विरुद्ध भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्यात सरळ लढत होणार आहे.

पदवीधर मतदार संघाची निवडणूक २६जून रोजी होणार आहे. या निवडणुकीकरिता शिवसेना ठाकरे गटाचे किशोर जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित सरय्या तर शिवसेना शिंदे गटाचे संजय मोरे यांच्यसह २५जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मनसेचे अभिजित पानसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते कि काय अशी स्थिती झाली होती. तर महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती, त्यामुळे आघाडी आणि महायुतीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा सुरु झाली होती.

अखेर आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात चर्चा झाल्यानंतर शिवसेनेने किशोर जैन, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमित सरय्या यांनी माघार घेतली तसेच शिंदे गटाचे श्री.मोरे यांनी देखिल उमेदवारी मागे घेतली,त्यामुळे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत रमेश किर आणि श्री. डावखरे यांच्यात सामना होणार आहे.

मागील निवडणुक तिरंगी झाली होती. त्या निवडणुकीत श्री.डावखरे यांना ३२ हजारपेक्षा जास्त मते मिळाली होती तर एकत्रित शिवसेनेचे संजय मोरे यांना २४ हजारपेक्षा जास्त मते मिळाली होती. त्या निवडणुकीत श्री. डावखरे हे दुसऱ्यांदा विजयी झाले होते. आत्ता ते विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

मागील सहा महिन्यांपासून डावखरे यांनी पदवीधर मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरु केले होते. सुमारे एक लाख पदवीधर मतदारांची त्यांनी नोंदणी केली आहे तर श्री. किर हे कोकणातील आहेत. त्यांना गाठीभेटी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर त्यांची मदार आहे, त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतो ते एक जुलै रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.