ठाणे: मुंब्रा येथे एका मराठी तरुणाला जमलेल्या जमावाने दमदाटी करत माफी मागायला भाग पाडल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून संबंधित युवक दोन्ही कानांना हात धरुन जमावाची माफी मागत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. मी केवळ फळविक्रेत्याला मराठीत बोल असा आग्रह केल्याचेही तो वारंवार सांगताना दिसून येत आहे.
विशेष म्हणजे याप्रकरणी मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या मराठी युवकास मुंब्रा येथील जमावाने शिवीगाळ केली आहे.
फळविक्रेत्याकडून फळे घेत असताना मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितले. मात्र, फळविक्रेत्याने मराठी येत नसल्याचे सांगत्यावरुन दोघांमध्ये हा वाद झाला. मला मराठी येत नाही मी हिंदीत बोलणार असं फळ विक्रेता बोलताच मराठी तरुण “महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे, मी मुंब्रा बंद करुन टाकेन” असं बोलू लागला. मराठी तरुणाच्या या वाक्यावरुन इतर फळविक्रेतेही तिथे आले व वाद आणखी चिघळला. इतर फळ विक्रेत्यांसह स्थानिक रहिवाशांनी देखील घटनास्थळी धाव घेत वाद जाणून मराठी युवकास घेरले. तसेच, मुंब्र्यात मराठी-हिंदी वाद का करतो, मुंब्रा शांत आहे, शांत राहू दे असं मुंब्र्यातील स्थानिक बोलू लागले. त्यानंतर, गर्दी वाढल्याने वाद चिघळला आणि लोकांनी त्या मराठी तरुणाला मुंब्रा पोलीस स्टेशन येथे नेऊन त्यावरच गुन्हा दाखल केला.
आम्हाला मराठी येत नाही, काय करायचे ते कर असं गर्दीतले लोकं बोलत होते, ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हिंदी येते तर हिंदीत बोल, वाद कशाला करतो असं बोलून मराठी तरुणाला पोलीस स्टेशनला नेण्यात आले. विशाल गवळी असे तरुणाचे नाव असून त्याला आईने फळं आणायला पाठवले होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमातून व्हायरल होत असून नेटीझन्स आपल्या कमेंट करत आहेत.