भविष्यात मुरबाड एक विकासाचे मॉडेल असेल – किसन कथोरे

मुरबाड : विधानसभा निवडणुकीचा नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी काल घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची सडेतोड उत्तरे दिली. १५ वर्षांच्या कालावधीत मुरबाड शहरासह तालुक्याचा चेहरा बदलला आहे. भविष्यात मुरबाड हे महाराष्ट्रातील एक विकासाचे मॉडेल असेल. त्यामुळे मी विकासाच्याच मुद्द्यावर आगामी निवडणूक लढवत असल्याचे श्री. कथोरे यांनी स्पष्ट केले.

श्री. कथोरे पुढे म्हणाले, काल,आज आणि उद्याही मुरबाडच्या विकासाचा ध्यास घेऊन मी काम करत आहे. मी केलेली विकास कामे आणि त्यासाठीचे प्रामाणिक प्रयत्न याच्यावर बोलतो आणि विश्वास ठेवतो. म्हणून मला जनतेचे पाठबळ मिळत आहे. त्याच जोरावर विविध विकास कामे आणि भविष्यात मुरबाड हे एक महाराष्ट्रातील एक विकासाचे मॉडेल बनविण्यासाठी माझे प्रयत्न आहेत, असेही श्री. कथोरे म्हणाले.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना श्री. कथोरे म्हणाले, माझ्या समोर कोणत्याही प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान नसून माजी खासदार कपिल पाटील हे माझ्या सोबत आहेत. मुरबाडची रेल्वे, माळशेज घाटातील काचेचा पुल, ग्रामीण भागासह, मुरबाड शहरातील रस्ते, संपूर्ण सिमेंट काँक्रीटीकरण करून डांबरमुक्त मुरबाड तालुका असे प्रकल्प डोळ्यासमोर असल्याचे श्री. कथोरे म्हणाले.