बदलापूर: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज करण्यात आली.
बदलापूर पश्चिमेकडील रमेशवाडी येथे प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून भाजयुमोच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. आव्हाड यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी भाजयुमो प्रदेश सचिव कॅप्टन पराग पातकर यांनी केली.
आमदार आव्हाड यांच्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही श्री.पातकर यांनी केली. भारतीय घटनेला अनुसरून तयार झालेल्या विधिमंडळाचा सदस्य असलेले आमदारच जर महामानवांचा अपमान करत असेल तर त्याला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आव्हाड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केली. तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श असून अशा महामानवांचा कुणी अवमान करीत असेल तर ही नीच वृत्ती ठेचून काढली पाहिजे, अशा शब्दांत माजी नगरसेवक किरण भोईर यांनी आव्हाड यांचा निषेध केला.
‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, ‘जितेंद्र आव्हाड हाय हाय’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजी नगरसेवक प्रशांत कुलकर्णी, प्रणिता कुलकर्णी, किरण बावसकर, प्रवीण चौधरी, मंगलसिंग राजपूत आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.