ठाणे: वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत ठामपाच्या योजनेंतर्गत अडथळा ठरत असलेला बेकायदेशीर पत्त्यांचा क्लब बंद करून अनधिकृत बांधकाम निष्कासित करावे, अशी मागणी ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.
वर्तकनगर हद्दीतील नाक्यावर म्हाडाच्या भूखंडावर एका व्यक्तिने जमिनाचा कब्जा करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केलेली आहेत, त्यातील एका बांधकामामध्ये पत्त्याचा रमी क्लब सुरु असून तो सध्या दोन भावांकडून क्लब भाड्याने चालवला जात आहे. सद्यस्थितीत सदरहू भुखंड हा म्हाडाने ठामपाला हस्तांतरीत केलेला असून त्या भुखंडावर ठामपाने पीपीपी तत्वावर पुनर्बांधणी योजना सुरू केलेली आहे. सदर योजने अंतर्गत विविध प्रकल्पबाधीतांचे पुर्नवसन करण्यात येणार आहे. त्या योजनेच्या अंतर्गत या क्लबचे बांधकाम बाधीत होत आहे. मात्र क्लब चालवणाऱ्या व्यक्ती ह्या राजकीय लोकांशी संबंधित असल्यामुळे क्लबचा वापर करून सदरहू बांधकाम निष्कासित होऊ नये यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. स्थानिक पोलिस स्टेशनला वारंवार तक्रार करून सुद्धा हा क्लब बंद केला जात नाही. हा क्लब तातडीने बंद करून हे बांधकाम पुर्णपणे निष्कासीत करणेकरिता ठामपा आयुक्त सौरभ राव ह्यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती श्री.चव्हाण यांनी दिली.
श्री. चव्हाण यांनी सदर ठिकाणी जाऊन ही बाब पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिल्या. हा क्लब लवकरात लवकर बंद झाला नाही तर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.