मुलांना पगार मिळाला नाही तर टोल नाक्यावर धिंगाणा घालू

मनसेचा मुलुंड टोल नाक्याच्या ठेकेदाराला अल्टीमेटम

ठाणे : सोमवारी मुलांना पगार मिळाला नाही तर टोल नाक्यावर धिंगाणा घालू असा कडक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुलुंड टोल ठेकेदाराला दिला आहे.
ठाण्यातील मुलुंड टोल नाक्यावर कंत्राटी पद्धतीने कित्येक मुले काम करत आहेत. यातील सुमारे १५ ते २० मुलांना गेले दोन महिन्याचा पगार ठेकेदाराने न दिल्याने या मुलांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. गरीब घरातील ही मुले गेले पाच-सहा दिवस ठेकेदाराच्या कार्यालयात पगार मिळेल या आशेने दिवसभर बसत होते, परंतु ठेकेदार पगार देत नसल्याने मुले हवालदिल झाली होती. खिशात पैसे नसल्याने या मुलांनी मुलुंड चेकनाक्यावरून चालत घंटाळी येथील मनसेचे कार्यालय गाठले. मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्याकडे ठेकदाराकडून पगार मिळत नसल्याची कैफियत मुलांनी मांडली. याची त्वरित दखल घेत मनसेचे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, मनसे वाहतूक सेना ठाणे शहर अध्यक्ष संदीप साळुंखे, विभाग अध्यक्ष निलेश चव्हाण व मनसे कार्यकर्त्यांनी मानपाडा, वरूण गार्डन येथील ठेकेदाराच्या कार्यालयाला धडक दिली. परंतु ठेकेदार याठिकाणी नव्हता.त्याचाशी फोनवरून संपर्क साधत मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी थेट इशारा देत या मुलांचे पगार सोमवारी झाले नाहीत तर सोमवारी मुलुंड टोल नाक्यावर धिंगाणा घालू आणि त्यानंतर जे घडेल त्याला ठेकेदार जबाबदार असले असा सज्जड दम दिला. यानंतर सोमवारी मुलांना पगार मिळेल असे आश्वासन ठेकेदाराने दिले आहे.