वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती आवश्यक
हायस्पीड गॅसमुळे आगीच्या घटना
ठाणे : वातानुकूलित यंत्रामध्ये ‘हायस्पिड गॅस’ भरलेला असतो. हा गॅस अतिशीघ्र पेट घेत असल्याने आगीची व्याप्ती झटपट वाढते. शिवाय यंत्र जुने झाल्यावर त्यात दोष निर्माण होतात. वेळीच देखभाल आणि दुरुस्ती न झाल्यास हेच एसी आपल्या घरात, कार्यालयात आणि मोठ मोठ्या आस्थापनांमध्ये पेरलेला बॉम्ब ठरू शकतो, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी दिली.
काही वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या एसी यंत्रणांमध्ये ‘२२ क्रमांकाचा नॉर्मल गॅस’ भरलेला असे. त्याकाळात अशा एसी यंत्रणांना आग लागल्याच्या घटना कधी ऐकिवात होत्या. जुन्या बनावटीच्या एसीमध्ये असलेला जुना गॅस पूर्णत: बंद करुन, त्याची जागा ‘हायस्पिड गॅस’ने घेतला आहे. अलिकडे तिस-या ३२ क्रमांकाच्या गॅसने जागा घेतली असली तरी त्याचा भरणा अनुभवी तंत्रज्ञांनीच करणे आवश्यक आहे, अशी माहिती तंत्रज्ञांनी दिली.
नव्या एसी यंत्रणा बसवताना मेकॅनिकने चुकीच्या पद्धतीने ‘गॅस चार्जिंग’केल्यास त्याचा जागेवरच ब्लास्ट होण्याची दाट शक्यता असते, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञ मनोज वायंगणकर यांनी दिली.
एसीची संपूर्ण यंत्रणा सुव्यवस्थित राखण्याकरीता वायरिंग, कंडेंसर किंवा अन्य भागांची नियमित निगराणी ठेवावी. ती खराब झाल्याचे आढळल्यास कन्डेंसर ‘चोक’ होऊन त्यात माती भरते. माती भरल्यास कंडेंसरचा दाब कॉम्प्रेसवर येऊन त्याचा उच्चदाब वाढतो. अॅम्पिअरवर दाब वाढल्यानंतर त्याचा दाब कपॅसिटीवर होऊन तो फुटल्याने त्यात असलेले तेल पेट घेते आणि त्याचा संपूर्ण परिणाम एसीच्या यंत्रणेवर, सर्किटवर होतो आणि एसीमध्ये मोठ्ठा बिघाड होतो, किंबहूना तो जळण्याची शक्यता जास्त असते. ते जळल्यानंतर एसीमधील एकूण एक यंत्रणा पेट घेऊ शकतात, अशी सविस्तर माहिती मनोज वायंगणकर यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.
एसीतील वायरिंग गरम झाले असल्यास, किंवा दुय्यम श्रेणीची चुकीची वायर वापरल्यास एसी यंत्रणा बंद (ट्रिप) होते. अन्यथा हे टाळण्याकरीता चांगल्या दर्जाची कॉपर वायर वापरावी, असे मत त्यांनी मांडले.
दलदल, खाडीच्या दमटपणामुळे, नाला, गटार घराजवळ असल्यास तांब्याची (कॉपर) वायर सडते किंवा तिला गंज येतो किंवा भोक पडते याकडेही या क्षेत्रातील तंत्रज्ञांनी लक्ष वेधले.
‘हायस्पिड गॅस’ फ्लेमेबल असून त्याचा वापर बाजारात नव्याने आलेल्या फ्रिजमध्येही केला जात आहे. हा गॅस धोकादायक असल्यामुळे गॅस भरणा-या तंत्रज्ञाला यातील संपूर्ण माहिती आणि सखोल ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते,असे वायंगणकर म्हणाले.
पूर्वीचा २२ क्रमांकाच्या गॅसचा दाब आणि सध्याच्या बाजारात आलेल्या एसी यंत्रणांमध्ये असलेला दाब थेट दुप्पट म्हणजे ६० ते ७० या दाबाचा असतो. त्याची वायरिंग यंत्रणा अनुभवी तंत्रज्ञांनीच करावी अन्यथा स्फोट होण्याची शक्यता असते, असे मत एका तंत्रज्ञाने मांडले.