ठाणे व्हिजन २०३०मधील कल्पनांचा नियोजनात होईल विचार-बांगर

ठाणे: आजचे विद्यार्थी आपल्या शहराचा कसा विचार करतात याचा अनुभव ठाणे व्हिजन-२०३० या उपक्रमाच्या निमित्ताने आला, असे उद्गार ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी काढले.

ठाणेवैभव आयोजित आणि वाविकर आय इन्स्टिट्यूट पुरस्कृत ठाणे व्हिजन-२०३० या उपक्रमात अभिजित बांगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्याशी थेट संवाद साधला. या उपक्रमाचे कौतुक करताना श्री. बांगर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मनातले ठाणे त्यांनी काढलेल्या चित्रांवरून आणि सादर केलेल्या मॉडेलवरून लक्षात आले. त्यांच्या कल्पनांचा आगामी काळात समावेश करण्याचा विचार करावा लागेल. सायकलिंग ट्रॅक, व्हर्टीकल गार्डन, सांडपाण्याचा पुनर्वापर, ड्रोनसारख्या उपकरणांचा वापर आरोग्य सेवेतील सुधारणा आणि मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांचा विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाचित्रांमध्ये समाविष्ट केल्याबद्दल आयुक्तांनी त्यांचे कौतुक केले.

विद्यार्थी शहर घडवत असतात, कारण त्यांच्यावर होणाऱ्या संस्कारांचा त्यांच्या वर्तनावर आणि दृष्टिकोनावर परिणाम होत असतो. स्पेनमधील बार्सिलोना आणि सिंगापूर या शहरांमधील अजाचे आधुनिकीकरण विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमुळे झाले, असे श्री. बांगर म्हणाले.

विविध शाळांमधून सहभागी विद्यार्थ्यांचे प्रकल्प आणि संकल्पना आधुनिक शहराला पूरक असून प्रदर्शनातील निवडक प्रकल्पांचा सन्मान ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात होईल, असे कौतुकोद्गार महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी काढले.

उद्याचे ठाणे शहर जाणून घ्या आज या संकल्पनेवर आधारित ठाणे व्हिजन २०३० या उपक्रमात १००हून जास्त शाळांतील २००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत २०० हून जास्त संकल्पनांवर आधारित मॉडेल्स सादर केले. पुढील सात वर्षांत ठाणे शहर कसे असावे हे चित्रांतून मांडण्याचा प्रयत्नही शेकडो विद्यार्थ्यांनी केला. या चित्रांचे आणि मॉडेलचे प्रदर्शन ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी शेवटच्या सत्रात ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, वाविकर आय इन्स्टिट्युटचे डॉ.चंद्रशेखर वाविकर, डॉ.वैशाली वाविकर, ठाणेवैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ, माजी नगरसेवक विकास रेपाळे आदी उपस्थित होते.