मामा-भांजे डोंगरावरील आगीत शेकडो झाडे भस्मसात

ठाणे: काल रात्री वागळे इस्टेट येथिल मामा-भांजे डोंगरावरील झाडांना लागलेल्या आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली. यात ठाणे महापालिकेने लावलेल्या एक लाख झाडांचा देखिल समावेश असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकमान्यनगर जुना बस डेपो येथून मामा-भांजे डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील गवताला आग लागली होती. या आगीने रौद्र रूप धारण केले आणि वाऱ्याच्या झोताने ती सर्वत्र पसरली. यात शेकडो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

आग लागलेल्या घटनेची माहिती वागळे अग्निशमन दलाला एका जागरूक नागरिकाने दिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान आणि अग्निशमन दलाचे जवान एका रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. सुमारे एका तासाच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आली. या आगीत काही वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेने लावलेल्या एक लाख झाडांचा देखिल समावेश असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही आग ठाण्याच्या काही उंच इमारतींवरून देखिल दिसत होती.

दरम्यान काल तीन ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. लोढा येथिल एका इमारतीच्या पार्किंगमधील चार चाकी गाडीला आग लागली होती तर कळवा येथिल जागृती गृहनिर्माण सोसायटीच्या वीज मीटर बॉक्सला आग लागली होती. घोडबंदर येथे कचऱ्याला आग लागली होती. या तीनही ठिकाणची आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली.