मांडली तलावासह इतर तलावात शेकडो माशांचा मृत्यू!

भाईंदर : भाईंदर पश्चिमेला महापालिकेच्या मांडली तलावात पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) केमिकलपासून बनविलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन केल्याने तलावातील पाणी दूषित व हिरवेगार रंगाचे घाण वास मारणारे झाले. तलावात असलेल्या जलचर प्राणी आणि मासे यांचा मृत्यू झाला आहे. तलावातील मोठ्या माश्यांपासून लहान माश्यांपर्यंत असंख्य मासे मृत झाले आणि तलावात तरंगत आहेत. मृत माशांना महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बाजूला काढून त्याचा ढिगारा केला आहे.

माशांच्या मृत्यूप्रकरणी आणि मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि पर्यावरण विभागाचे आदेश डावलून कृत्य केल्याप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने आणि शासनाच्या पर्यावरण विभागाने दिलेल्या आदेशानुसार नैसर्गिक आणि सार्वजनिक तलावात पीओपी बंदी असलेल्या देवी देवतांच्या मूर्ती विसर्जित करू नयेत त्यासाठी स्वतंत्ररित्या कृत्रिम तलाव बांधून त्यात त्या मूर्ती विसर्जित कराव्यात आणि त्याचा मलबा हा पालिकेने व्यवस्थितरित्या उचलून नेऊन विल्हेवाट लावावी. परंतु पालिकेने केमिकलयुक्त साहित्य तलावात विसर्जित केले. पाणी दूषित आणि हिरवेगार होऊन तलावात मृत मासे तरंगत होते. शिवार गार्डन आणि जरीमरी तलाव काशीमिरा येथेही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

या प्रकरणी ठाणे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्याचा पंचनामा करून कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण कार्यकर्त्यांनी केली आहे. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पडवळ यांनी या माशांच्या मृत्यू प्रकरणी चिंता व्यक्त केली असून भविष्यात पर्यावरण पोषक मूर्तीबाबत प्रबोधन आवश्यक असल्याचे सांगितले.