मतदान केंद्रात असंख्य गैरसोयी काम करायचे कसे?

अंबरनाथ : लोकसभा निवडणुकीसाठी उद्या सोमवारी मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असली तरी येथील एका मतदान केंद्रावर असंख्य गैरसोयी असून मतदानाचे काम करायचे कसे असा प्रश्न मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पडला आहे. याबाबत अतिरिक्त सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांती माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्वरित दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
उद्या सोमवार 20 मे रोजी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी अंबरनाथ येथे नियुक्त करण्यात आलेले मतदान केंद्र प्रमुख आणि अन्य अधिकारी कर्मचारी नेमून देण्यात आलेल्या मतदान केंद्रावर पोहोचले आहेत, मात्र अंबरनाथ शहरातील शिवाजीनगर येथील जिजामाता विद्यामंदिरात असलेल्या मतदान केंद्रामध्ये पुरेसे पंखे, स्वच्छतागृह पिण्याचे पाणी, सारख्या मूलभूत सुविधा नसल्याने अधिकारी, कर्मचारी यांनी नाराजी व्यक्त केली.
आज रात्री मुक्काम करायचा तरी कसा असा प्रश्न संबंधित मतदान अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला पडला आहे. यामध्ये काही महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. पत्रा असलेल्या वर्ग खोल्यात पंखे नाहीत, लॅपटॉप, मोबाईल चार्जिंगची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृह नसल्याने देखील कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
संबंधित मतदान केंद्रावरील गैरसोयीबाबत अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांती माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्वरेने या प्रकरणी दखल घेऊन नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत कल्पना दिली.
पालिका अधिकाऱ्यांनी देखील मतदान केंद्रात येऊन पाहणी केली, आज रविवारी सायंकाळी त्याबाबत चर्चा करून आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात प्रयत्न येतील, तात्पुरते फिरते स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करून दिली जाईल, असेही संबंधित पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.